पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत त्यासंदर्भात पाकिस्तानला इशारा दिला आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांसोबत भारताची चर्चा सुरु आहे. भारताने कुटनीतीचे अवलंबन करत पाकिस्तानचे विरोधक असलेल्या तालिबानसोबत चर्चा केली आहे. भारताचे अफगाणिस्तान व्यवहार प्रमुख आनंद प्रकाश यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा केली. अफगाणिस्थानच्या माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनी टोलो न्यूजनुसार, काबूलमध्ये झालेल्या या बैठकीत कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारतासोबत राजकीय आणि आर्थिक संबंध वाढवण्यावर भर दिला. मुत्ताकी यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध वाढविण्यावर भर दिला. तसेच भारतीय गुंतवणूकदारांनी अफगाणिस्तानमधील गुंतवणूक संधींचा फायदा घ्यावा, असे सांगितले. अफगाण प्रवक्त्याचा हवाला देऊन माध्यमांनी ही माहिती दिली.
भारत आणि अफगाणिस्तानमधील या चर्चेत भारत-पाकिस्तानमधील तणावासंदर्भात काय बोलणी झाली? त्याची माहिती मिळाली नाही. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच या प्रसंगी ते भारतासोबत उभे राहतील, असे म्हटले होते. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांनीही पहलगाम हल्ल्यावर निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, अशा घटना प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेच्या प्रयत्नांना कमजोर करतात. या परिस्थितीत दोषींना शिक्षा होणे महत्वाचे आहे. यामुळे ही बैठक खूप महत्वाची मानली जात आहे.
अफगाणिस्तानमधील वाढत्या मानवी संकटामुळे कोणत्या अडथळ्याविना मदत करण्याच्या तयारीत भारत आहे. औषधी आणि इतर जीवनावाश्यक गोष्टींचा पुरवठा भारत करणार आहे. जून २०२२ मध्ये भारताने काबूलमधील आपल्या दूतावासात आपले पथक पाठवून आपले राजनैतिक काम पुन्हा सुरु केले. त्यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना परत बोलवले होते. भारताने तालिबान सरकारला अजूनही मान्यता दिली नाही.