Dapoli: दापोलीत पर्यटकांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल..
esakal April 28, 2025 06:45 PM

दापोली : आकुर्डी, पुणे येथून दापोली तालुक्यातील कर्दे येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना २६ रोजी रात्री ११.३० वाजता अज्ञात ६ ते ७ जणांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहीतीनुसार आकुर्डी पुणे येथील अक्षय अनिल मोरे हे त्यांच्या मित्रासह काल दुपारी ११.३० च्या सुमारास कर्दे येथे आले तेथे त्यांनी कल्पतरू निवास येथे एक रूम घेतली. विश्रांती घेवून रात्री ८.३० वाजता ते जेवण करण्यासाठी बाहेर गेले. रात्री ११.३० वाजता ते परत येत असताना एका पुलावर त्यांची गाडी आली असता त्यांच्या गाडीवर कोणीतरी बॅटरिचा प्रकाश मारला त्यामुळे ते घाबरले व रिसोर्टवर परत आले.

गाडीमधून ते उतरत असताना अचानक ६ ते ७ जण तेथे आले व त्यांनी मोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व आता तुम्हाला तुमची रूम खाली करावी लागेल अशी धमकी देत पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ठाणे येथून आलेल्या पर्यटकांनी पहिली व त्यांनी मध्यस्ती केल्याने मारहाण करणाऱ्या व्यक्ती तेथून निघून गेल्या. त्यानंतर अक्षय मोरे यांनी दापोली पोलीस ठाण्यात येवून अज्ञात व्यक्तीविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक डी.डी. पवार करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.