नाशिक- एमएचटी-सीईटी परीक्षेची प्रक्रिया रविवारी (ता. २७) पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पार पडलेल्या परीक्षेत पहिल्या टप्प्यातील पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला सरासरी ९५ टक्के उपस्थिती राहिली. पीसीएम ग्रुपच्या परीक्षेला उपस्थितीचे प्रमाण ९४.३९ टक्के राहिले. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा लागून राहणार आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी व संलग्न विषयांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९ ते १७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा घेतली. १९ एप्रिल ते रविवार (ता. २७) यादरम्यान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा घेतली आहे.
आता पुढील टप्प्यात प्राथमिक उत्तरतालिका उपलब्ध करून देताना त्यावर सूचना, हरकती मागविल्या जातील. यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर निकालाचा मार्ग मोकळा होईल. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल १५ मेदरम्यान लागण्याची शक्यता आहे. याच कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकालदेखील लागू शकतो. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेशाची प्रक्रिया नेहमीपेक्षा लवकर सुरू होऊ शकते.
पीसीएम ग्रुप
परीक्षा केंद्रांची संख्या : १०
एकूण परीक्षा सत्र : १५
प्रविष्ट विद्यार्थी : २९,६२१
उपस्थित विद्यार्थी :२७,९६२
गैरहजर विद्यार्थी : १, ६५९
उपस्थिती : ९४.३९ टक्के
पीसीबी ग्रुप
परीक्षा केंद्रांची संख्या : ९
एकूण परीक्षा सत्रे : १३
प्रविष्ट विद्यार्थी : २१,९११
उपस्थित विद्यार्थी : २०,८१७
गैरहजर विद्यार्थी : १,९४
उपस्थिती : ९५ टक्के