Shoaib Akhtar YouTube Ban : शोएब अख्तरच्या पोटावर पाय! पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारच्या कारवाईत याचं पण दुकान बंद
esakal April 28, 2025 06:45 PM

Pakistan Youtube Channels Blocked in India : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच, भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून आता पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

भारत सरकारने ज्या १६ यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई केली, त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या चॅनेलचाही समावेश आहे. शोएब अख्तरचे यूट्यूब चॅनेल भारतात बंद करण्यात आले आहे. “भारत सरकारच्या आदेशानुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या चॅनेलवरील सर्व कटेंट स्थगित करण्यात आला आहे,” असा संदेश त्याच्या चॅनेलवर दिसत आहे.

यांच्यासह पाकिस्तानच्या अन्य १५ यूट्यूब चॅनेल्सवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे. या चॅनेल्सवर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याचा आरोप आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची घटना घडली होती. हा हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा समावेश होता. यावेळी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.