'हेरा फेरी', 'ओह माय गॉड', 'हलचल' यांसारख्या चित्रपटातून आयकॉनिक भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांनी आपल्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितलाय जो ऐकून सगळेच चकीत झालेत. परेश यांनी आपली प्रत्येक भूमिका इतक्या सुंदर पद्धतीने निभावली की त्या भूमिका अजरामर झाल्या. त्यांचं नाव सगळ्यात दर्जेदार अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. सध्या ते सोशल मिडितांवर चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक वक्तव्य. एका दुखापतीनंतर ते स्वतःची लघवी पीत होते. त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय.
परेश यांनी सांगितलं की ते राजकुमार संतोषी यांच्या 'घातक' या चित्रपटाची शूटिंग करत होते. तेव्हा राकेश पांडेसोबतच्या एका सीनमध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. त्यानंतर टीनू आनंद आणि डैनी डेन्जोंगपा त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा त्यांना खूप भीती वाटत होती आणि आता आपलं करिअर संपलं असं त्यांना वाटत होतं. तेव्हा अजय देवगनच्या वडिलांनी परेश यांना लघवी पिण्याचा सल्ला दिला होता.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश म्हणाले, 'मी नानावटी हॉस्पिटलमध्ये असताना, वीरू देवगण मला भेटायला आला. मी तिथे आहे हे त्याला कळताच तो माझ्याकडे आला आणि विचारले की मला काय झालं ? मी त्याला माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल सांगितले. त्याने मला सकाळी उठल्यावर सर्वात आधी लघवी प्यायला सांगितलं. सर्व लढवय्ये असे करतात. तुम्हाला कधीही कोणताही त्रास होणार नाही, फक्त सकाळी उठल्यावर सर्वात आधी लघवी प्या. त्याने मला दारू, मटण किंवा तंबाखू खाऊ नको असं सांगितलं, जे मी थांबवलं. त्याने मला नियमित अन्न खाण्यास आणि सकाळी लघवी पिण्यास सांगितलं.'
परेश रावल म्हणाले, 'मी ते बिअरसारखे घोट घोट करून प्यायचो कारण जर मला ते प्यावं लागतंय तर मी ते व्यवस्थित पिईन. मी हे १५ दिवस केलं आणि जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांना एक्स-रेवर एक पांढरा थर दिसला, जो दाखवत होता की मी बरा झाला आहे. त्यांनी सांगितलं की दुखापत बरी होण्यासाठी साधारणपणे २ ते अडीच महिने लागतात, परंतु ती फक्त दीड महिन्यात बरी झाली.
परेश रावल यांचे पुढील चित्रपटकामाच्या बाबतीत सांगायचं तर, परेश रावल पुढे प्रियदर्शनच्या हॉरर कॉमेडी 'भूत बंगला' मध्ये दिसणार आहेत, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि तब्बू देखील आहेत. त्यांच्याकडे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत 'हेरा फेरी ३' देखील आहे.