Pahalgam News : पहलगाममध्ये पुन्हा पर्यटकांचे आगमन सुरू
esakal April 28, 2025 08:45 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(ता.२१) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसांनंतर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, येथे पुन्हा पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे.

आम्ही विचारांती पहलगाम येथे येण्याचा निर्णय घेतला, असे येथे येणाऱ्या काही पर्यटकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतरच ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसर वगळता पहलगाम पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

पर्यटनावरच उपजीविका अवलंबून असलेल्या पहलगाममध्ये एरवी दररोज सहा ते सात हजार पर्यटक येत असत. मात्र पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ही संख्या शंभर पेक्षाही कमी झाली होती. मात्र रविवारी या संख्येत वाढ दिसून आली.

देशातील पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकही येथे आल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. जे झाले ते दुर्दैवी होते पण त्याने घाबरून चालणार नाही, असे मत महाराष्ट्रातील पर्यटकांच्या समूहाने रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.