Vaibhav Suryawanshi : आयपीएल 2025 स्पर्धेला चांगलाच रंग चढला आहे. 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन दिग्गज संघांच्या सामन्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या सामन्यात अवघ्या 14 वर्षांच्या कोवळ्या पोरानं सर्वांनाच घाम फोडला आहे. त्यानं फक्त 35 चेंडूमध्ये तुफानी शतक ठोकलंय. दरम्यान, त्याच्या या दैदीप्यमान कामगिरीचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक होत आहे. दरम्यान, त्याची ही कामगिरी पाहून क्रिकेटचे चाहते विराट कोहलीला टार्गेट करत आहेत.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात गुजरातने राजस्थानपुढे विजासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी राजस्थानला फार काही मोठे कष्ट करावे लागले नाही. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या जोडगोलीने तुफानी फलंदाजी केली. यशस्वीने अवघ्या 40 चेंडूमध्ये तब्बल 70 धावा केल्या तर वैभव सूर्यवंशीने फक्त 38 धावांत तब्बल 101 धावा काढल्या. त्याने 35 चेंडूंमध्ये तुफानी शतक ठोकलं. आपल्या या खेळीत त्याने तब्बल 11 षटकार तर 7 चौकार मारले. त्याच्या याच तुफानी खेळीचं जगभरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीचा हा खेळ पाहून लोक विराट कोहलीला टार्गेट करत आहेत. अवघ्या 14 वर्षांच्या या पोराने तुफान खेळ केला. पण त्याला आयपीएलमध्ये फक्त 1 कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं. पण आतापर्यंतच्या सामन्यांत फार अशी चमकदार कामगिरी करू न शकलेल्या विराटला मात्र बंगळुरू संघाने तब्बल 21 कोटी रुपये मोजले, अन्यायकारक आहे, अशी भावना नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाचे आणखी काही सामने बाकी आहेत. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणखी जोमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच्या या कामगिरीचे सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.