मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदार संघातील 22 हजार 326 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023/ 24 मध्ये भरलेल्या विविध पिकांच्या पीक विम्यापोटी 59 कोटी 19 लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झाला असून, येत्या आठवड्या भरात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाने राबविली होती. त्या माध्यमातून मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर या मोहोळ विधानसभा मतदार संघातील 22 हजार 326 शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचा पिक विमा भरला होता. पिक विमा भरल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला फोन करून कळविले होते.
त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी व कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष सर्वे केला होता. त्यानुसार हा पीक विमा मंजूर झाला आहे. चालू वर्षी पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक मोडून टाकले, त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती, तर शेतकऱ्यांचे पूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले होते. मात्र या 59 कोटी 19 लाख रुपयांच्या पिकविम्या मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वात जास्त विमा उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर सर्वात कमी विमा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला होता.
दरम्यान पीक विमा भरल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार माने यांच्याकडे पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत माजी आमदार माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पाठपुरावा केला होता. त्याला यश प्राप्त होऊन 22 हजार 326 शेतकऱ्यांना 59 कोटी 19 लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी संख्या व त्यांना मिळालेली रक्कममोहोळ शेतकरी संख्या- 8 हजार 856 मिळालेली विम्याची रक्कम 22 कोटी 9 लाख रुपये-----
उत्तर सोलापूर शेतकरी संख्या- 12 हजार 519 मिळालेली पीक विम्याची रक्कम 34 कोटी 81 लाख रुपये----
पंढरपूर शेतकरी संख्या- 951 मिळालेली पीक विम्याची रक्कम दोन कोटी 29 लाख रुपये-