Adani Group Legal Issues: उद्योगपती गौतम अदानी यांना लवकरच लाचखोरी प्रकरणात 'क्लीन चिट' मिळू शकते. अमेरिकन न्यायालयात लाचखोरीचा खटला सुरू असलेल्या गौतम अदानी यांच्या टीमने नुकतीच डोनाल्ड ट्रम्प सरकारसोबत एक विशेष बैठक घेतली आहे. या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि गौतम अदानी यांच्या टीममध्ये या विषयावर दीर्घ चर्चा झाली.
ब्लूमबर्ग न्यूजच्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांच्या टीमने डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अदानींवरील आरोप मागे घ्यावेत यासाठी अपील केली आहे. लाचखोरी प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीबाबत हे अपील करण्यात आले आहे.
या बैठकीदरम्यान, गौतम अदानी यांच्या टीमने हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की, या प्रकरणाचा पुनर्विचार करायला हवा. गौतम अदानी यांच्या लाचखोरी प्रकरणाबाबत या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चा सुरू झाली आहे. पण अलिकडच्या आठवड्यात त्याला वेग आला आहे. जर या मुद्द्यावरील चर्चा याच गतीने सुरू राहिली तर येत्या काही महिन्यांत या विषयावर मोठा निर्णय येऊ शकतो. गौतम अदानी यांनाही क्लीन चिट मिळू शकते अशी शक्यता आहे.
जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच, गौतम अदानी यांना या प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता वाढली. नोव्हेंबर 2024मध्ये, अमेरिकन तपास संस्थांनी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध लाचखोरीचा हा खटला दाखल केला होता.
काय आहे प्रकरण?अमेरिकन तपास संस्थांना गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरुद्धच्या चौकशीत असे आढळून आले की, भारतीय कंपनीला (अदानी ग्रुप) वीज पुरवठ्याचे कंत्राट मिळावे यासाठी, दोघांनीही भारतातील अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाच दिली.
या करारांच्या आधारे,अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आणि कर्ज घेतले, असा आरोप आहे. या प्रकरणात, अमेरिकन बाजार नियामकाने गौतम अदानी आणि सागर अदानी यांनाही समन्स बजावले होते.