नाशिक- नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून येणारे भाविक व पर्यटकांसाठी पर्यटन संचालनालय सुसज्ज टेंट सिटी उभारणार आहे. साधारणत: १०० एकरावरील प्रस्तावित सिटीसाठी जागेचा शोध घेण्यात येत असून, पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संचालनालयाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे.
कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पावले उचलली आहेत. देश-विदेशातून येणारे भाविक- पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी अत्याधुनिक टेंट सिटी उभी करण्याचा मानस आहे. त्यासाठी अंदाजे २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर महामार्ग, पहिने बारी, ओझर विमानतळ, तपोवन परिसरालगत व अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणी त्यादृष्टीने पर्यटन संचालनालय जागेचा शोध घेत आहे.
टेंट सिटी उभारणीसाठी शासकीय जागांना प्राधान्य देण्यात यावे, जेथे शक्य नाही अशा ठिकाणी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात चाचपणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पर्यटन संचालनालयाला केल्या आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी येणाऱ्या भाविकांबरोबर देश- विदेशातून सिंहस्थासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुसज्ज अशा टेंट सिटीत निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नाशिक दर्शन बसचा प्रस्ताव
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक दर्शन बस पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. यानिमित्त शहरातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांसह इतिहासाची साक्ष देणारे गड- किल्ले, पर्यटनस्थळे, ॲग्रो टुरिझम व धरणांच्या क्षेत्रातील पर्यटनाला चालना देण्यात येईल. पर्यटन संचालनालयातर्फे स्वमालकीच्या बस खरेदीसह कर्मचारी व गाइड्सची नियुक्ती केली जाईल. सुमारे दोन कोटींचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे.
माहिती केंद्राची निर्मिती
नाशिक जिल्ह्यातील व लगतच्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयातर्फे माहिती केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. संचालनालयाच्या आराखड्यात या केंद्रांचा समावेश केला असून, त्यात कायमस्वरूपी आठ व तात्पुरत्या २० केंद्रांचा समावेश करण्यात आला. अंतर्गत व बाह्य वाहनतळाच्या ठिकाणी माहिती केंद्र प्रस्तावित आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील पर्यटनाची सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
पर्यटनासाठी हेही महत्त्वाचे
२४ बाय ७ हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करणे
पर्यटन संचालनालयाचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करणे
गाइड्सची नेमणूक करणे, प्रशिक्षण कार्यशाळा घेणे
पर्यटनस्थळी माहिती फलक लावणे
महत्त्वाच्या पर्यटनस्थळी दिशादर्शक फलकांची उभारणी
कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी संधी