ढिंग टांग : वाघझरीतील रानकथा…
esakal April 29, 2025 09:45 AM

ढिंग टांग

‘ने पतीच्या झुडपात खसफस झाली’ या वाक्याने खरे तर या अरण्यकथेची सुरवात व्हायला हवी. अरण्यकथेत दरवेळी नेपतीच्या झुडपातून वाघाचे मुस्कट दिसू लागते. तिथूनच वाघाला एण्ट्री असते, आणि सदरील वाघ पाणवठ्याकडेच निघालेला असतो. पण इथे तसे करणे सत्याचा अपलाप करणे ठरेल. कारण नेपतीच्या झुडपात खसफस करण्याइतकेही त्राण वाघात नव्हते.

हल्ली वाघांचा दबदबा कमी झाला असावा. कारण वाघ निघाला की, काटेसावरीवरली बोंडे खाली टाकणारी वानरे कचकचाट करत नाहीत. निमूटपणे बोंडे खात बसतात. वाघाला कोण घाबरते? हरणांचा कळप कानदेखील हलवत नाही. मागल्या खेपेला तर एका काळवीटाच्या नराने हूल देऊन आख्खाच्या आख्खा वाघ पाणवठ्यावरुन हाकलला होता. मोरही आताशा वाघ आल्याचा इशाराबिशारा देत नाहीत. वाघझरी अभयारण्यातले वाघ सध्या भयाकुल झाले आहेत, हे खरोखर दुर्दैवी आहेत.

नेपतीच्या झुडपातून गपचूप आवाज न करता बाहेर आलेल्या एस-१ वाघाने पुढे जाऊन पाहिले. त्याच्यासोबत त्याचा बछडा ऊर्फ एस-२ सुद्धा होता. त्याचे भविष्यात कसे होणार, या चिंतेने एस-१ ग्रासून गेला होता.

‘‘चल, दबकत पाणवठ्याकडे जाऊ! जमेल तितकं पिऊ…तहान फार लागली आहे,’’ एस-१ म्हणाला. बछडा तयार झाला. जंगलात पाण्यासारखे एनर्जी ड्रिंक नाही. पूर्वीच्या काळी पाणी पिताना वाघ तोऱ्यात म्हणायचे : ‘सीधी बात, नो बकवास!’ आणि बाकीचे प्राणी टरकायचे. सध्या परिस्थिती उलट आहे.

‘‘बॅब्स, गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रातले वीस वाघ दगावले…धिस इज सीरिअस, इजंट इट?’’ बछडा कमालीचा हुशार आहे. त्याच्यासारखे जीके (पक्षी : जनरल नालेज) उभ्या व्याघ्रप्रजातीत कुणाला नाही.

‘‘हो ना!,’’ बॅब्स जड पंजांनी चालत म्हणाले. हल्ली वाघांना वाईट दिवस आले आहेत, हे या कोवळ्या पोराला कसे सांगायचे? त्यांना भडभडून आले…

‘‘ट्वेंटी टायगर्स इन फोर मंथ्स…मग आपण इथं का राहातोय? फॉरेस्ट मिनिस्टरला सांगून आपली बदली भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात का करुन घेत नाही तुम्ही?’’ बछडा कमालीचा कुशाग्र बुद्धीचा हे मघाशी ओघात आलेच होते…

‘‘आपला सध्या काही वशिला नाही ना तिथं!,’’ एस-१ ऊर्फ बॅब्स म्हणाले.

‘‘तिथं पेंग्विन सुखानं राहतात, आपणही राहू!,’’ बछड्याला पेंग्विनचा राजेशाही थाट आठवला.

काहीएक निर्णय घेऊन एस-१ ने शेवटी खरे बोलायचे ठरवून टाकले. एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, ‘‘वाघांचे दिवस सध्या फिरले आहेत, वाघांना कुणी इथं वाघझरीत विचारत नाही, भायखळ्याची स्वप्न कसली बघतोस? करिअरची स्वप्न बघू नकोस, जमेल तशी शिकार करत इथंच बस्तान बसव…कळलं?’’

बछडा नाराज झाला. पण काही बोलला नाही. एका माकडाने त्या दोघांना वेडावून दाखवले तरीही खालमानेने ते चालत राहिले…

‘‘सध्या फॉरेस्ट मिनिस्टर कोण आहेत?,’’ बछड्याने विचारले.

‘‘कोणीतरी मि. नाईक म्हणून आहेत, पण आपण फॉरेस्ट मिनिस्टर आहोत, हे त्यांनाही अजून कळलेलं नाही म्हणे!,’’ बॅब्सनी उत्तर दिले.

‘‘आधी कोणीतरी मुनगंटीवारकाका होते ना, त्यांच्या टर्ममध्ये वाघांची संख्या सशांना लाज वाटेल एवढी वाढली होती म्हणे!,’’ बछडा कधी कधी फार आगाऊ बोलतो, तसेच बोलला.

‘‘मुनगंटीवारजी? हो हो…वा वा…मोठा माणूस, मोठा माणूस!,’’ बॅब्स जबडा हलवत कृतज्ञतेने पुटपुटले.

‘‘त्यांना परत का नाही आणत?,’’ बछड्यानं निरागस प्रश्न विचारला. बॅब्सना पुन्हा एकदा भडभडून आले.

‘‘बाबा रे, जसे वाघांचे वाईट दिवस असतात, तसे काही माणसांचेही असतात!,’’ बॅब्स म्हणाले.

…बाप आणि बेटा, दोघेही पाणवठ्यावरचे पाणी लपालपा पिऊ लागले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.