आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत २० एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स संघ आमने-सामने होते.
मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.
त्या सामन्यानंतर पंजाब किंग्सची संघमालकिण प्रीती झिंटा आणि बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली गप्पा मारताना दिसले होते.
त्यावेळी ते फोनमध्ये काहीतरी दाखवून बोलत असल्याचे दिसले होते. त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता.
आता त्याबद्दल एका युझरने प्रीती झिंटाला त्यावेळी नेमकं दोघांमध्ये काय बोलणं झाला, याबद्दल एक्सवर (आधीचे ट्वीटर) प्रश्न विचारला.
त्याचं उत्तर देताना प्रीती झिंटाने सांगितले की 'आम्ही एकमेकांना आमच्या मुलांचे फोटो दाखवत होतो आणि त्यांच्याबद्दलच बोलत होतो.'
प्रीती झिंटाने पुढे लिहिले की 'वेळ पटकन निघून जातो, जेव्हा मी १८ वर्षांपूर्वी विराटला भेटले होते, तेव्हा तो प्रचंड प्रतिभा आणि आतमध्ये आग असलेला किशोरवयीन खेळाडू होता. आजही त्याच्यात ती आग आहे आणि आता तो एक आयकॉन असून खूप गोड वडील आहे.'