लढाई समाजाच्या नजरेशीही!
esakal April 29, 2025 10:45 AM

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होतो, तेव्हा समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. लोकांच्या नजरेत कॅन्सरच्या रुग्णांबद्दल फक्त दया असते. ‘हा आता वाचणार नाही’ असं गृहीत धरलेलं असतं. ऑपरेशन की रेडिएशन, कीमो - हे रुग्णापेक्षा जास्त लोकांनाच चिंता देतं. केस गेले की चेहरा विद्रूप होईल, ही कल्पना त्यांना त्रास देते. ‘त्याच्या मुलांचं, त्याच्या परिवाराचं आता काय होणार?’ हा प्रश्न लोकांच्या मनाला जास्त भेडसावत असतो.

लोकांचे असे विचार जेव्हा अशा रुग्णाला जाणवतात, तेव्हा त्या व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य बाजूला पडतं. ती सतत ‘आपल्यालाच का झालं?’, ‘आता पुढे काय?’ असे विचार करत राहते, आणि मग चिंता आणखी वाढते.

सुरुवातीला काळजी करणारे, हळूहळू नजर चुकवू लागतात, आणि नकळत त्यांचं वागणंही बदलतं. घरच्यांची काळजी, आजूबाजूच्या लोकांची सहानुभूती, ओठांवरचा करुण भाव हे सर्व त्या व्यक्तीला बळ देण्याऐवजी तोडून टाकतात. खरंतर कर्करोगाच्या रुग्णांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे.

उपचारांची प्रक्रिया मोठी असली, तरी आपण सकारात्मक विचार ठेवला, तर त्याला सामोरं जाणं अवघड नाही. केस गळतात, औषधांचे साइड इफेक्ट्स दिसू लागतात. पण हे सगळं झेलता येतं. पण हे फक्त क्षणिक असतं..

खरं दुखतं तेव्हा, जेव्हा समाजाची वागणूक बदलते. तुमच्या बाह्य सौंदर्यातून तुमच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा खरंच आश्चर्य वाटतं – कारण मी मीच आहे, पण आसपासच्या लोकांचे विचार बदलले आहेत.

एकेकाळी आपल्या डोक्यावरून हात फिरवणारे लोक आज नजर चुकवतात, टाळायला लागतात. कधी कधी, ‘ती कॅन्सरची पेशंट आहे गं!’ असं कोणीतरी हळूच सांगताना दिसतं. त्यावेळी कॅन्सरनं कुणाला नक्की झपाटलं तेच कळत नाही. काही लोक प्रेमानं बोलतात; पण त्यांच्या चेहऱ्यावर असलेली करुण नजर मन पोखरून टाकते. ‘बिचारी’... का? मी लढतेय ना? मी हिंमत दाखवतेय ना? मग दया का?

औषधांचे साइड इफेक्ट्स शरीरावर परिणाम करतात; पण समाजाच्या वागणुकीचे साइड इफेक्ट्स मन पोखरतात. एक क्षण येतो, जेव्हा आपण विचार करतो, ‘‘हे चुकीचं आहे का माझं? मी आजारी आहे; पण त्यामुळे मी कमी नाही ना?’’ अशा वेळी... ते आपला हात न सोडणाऱ्या थोड्या फार आपल्या व्यक्तीच आपली खरी शक्ती बनतात. कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे, ती एक लढाई आहे – मनाने, शरीराने आणि समाजाच्या नजरेशी. या लढाईत शरीर थकतं, तेव्हा मनाला बळ द्यायचं असतं. समाजानं सहानुभूती नव्हे, तर समज द्यायची असते.

कॅन्सर फायटर्सना मी एकच सांगेन... कुणाला काय वाटतं, त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, हे खूप महत्त्वाचं असतं. दुसऱ्यांचा दृष्टिकोन हा तुमचा दृष्टिकोन कधीच होऊ शकत नाही. कॅन्सर हा शब्द जरी भीतीदायक वाटत असला, तरी त्यातून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. हल्लीचे उपचार खूप चांगले आहेत. फक्त तुम्ही हार न मानता शरीर आणि मनाने सज्ज व्हा. अशक्य असं आयुष्यात काहीच नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर कोणताही आजार हरवणं अशक्य नाही.

शेवटी कॅन्सर फायटरला एकच सांगेन...

आजारी माझं शरीर आहे, मी नाही.

माझा आत्मविश्वास अजून जिवंत आहे.

माझ्या अस्तित्वाची किंमत दयेने मोजू नका.

समजुतीने आणि सन्मानाने बघा.

---कारण कॅन्सर माझ्या शरीराला झालाय, माझ्या मनाला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.