IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला, टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा जिंकली
GH News April 29, 2025 09:08 PM

टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यातील वूमन्स ट्राय सीरिजमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेनंतर दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारली आहे. महिला ब्रिगेडने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 50 षटकांमध्ये 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने अप्रतिम सुरुवात करत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलं होतं. मात्र अखेरच्या टप्प्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि रंगतदार झालेल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 261 धावांवर गुंडाळलं.

दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी

दक्षिण आफ्रिकेने विजयी धावंचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. सलामी जोडीने 140 धावांची भागीदारी केली. त्यामुळे हा सामना गेलाच, असंच वाटत होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अतंराने झटके दिले आणि सामन्यात आव्हान कायम ठेवलं. मात्र दक्षिण आफ्रिका काही अंशी मजबूत स्थितीत होती. दक्षिण आफ्रिकेने 45.5 ओव्हरमध्ये 240 रन्सवर पाचवी विकेट गमावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 25 चेंडूत 37 धावांची गरज होती.

गोलंदाजांनी सामना फिरवला

दक्षिण आफ्रिकेकडे आणखी 5 विकेट्स होते. तसेच ओपनर तांझिम ब्रिट्स मैदानात होती. त्यामुळे तांझिम दक्षिण आफ्रिकेला विजयी करेल, अशी आशा दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना होती. मात्र महिला ब्रिगेडने भेदक गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला पुढील 21 चेंडूत 5 झटके दिले आणि सलग दुसरा सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकेसाठी तांझिम ब्रिट्स हीने सर्वाधिक 109 धावांची शतकी खेळी केली. मात्र अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले हाती आलेला सामना गमावला. त्यामुळे तांझिमची शतकी खेळी व्यर्थ ठरली. दक्षिण आफ्रिकेकेडून एकीलाही मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडून स्नेह राणाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर अरुंधती रेड्डी, एन चरणी आणि दीप्ती शर्मा या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर कडक फिल्डिंगच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या 2 फलंदाजांना रन आऊट केलं.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून 276 धावा केल्या. महिला ब्रिगेडसाठी ओपनर प्रतिका रावल हीने सर्वाधिक 78 धावा केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रॉड्रिग्स या दोघींनी प्रत्येकी 41-41 धावा केल्या. स्मृती मंधानाने 36, हर्लीन देओल 29 आणि रिचा घोषने 24 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा हीने 9 आणि काश्वी गौतमने 5 धावाचं योगदान दिलं. तर दक्षिण आफ्रिकेच्या एकीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.