आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी हा सर्वात चर्चित चेहरा आहे. वैभव सूर्यवंशी कमी वयात आणि क्रिकेटमध्ये अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. फक्त 14 वय असताना आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांना सामोरं गेला. इतकंच काय तर निर्भयपणे त्यांना फटकावलंही. अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोवळ्या वयात इतकी मोठी कामगिरी करणं म्हणजे खरंच काही तरी दैवी शक्ति पाठीशी असावी असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. वैभवचा निर्भय खेळ पाहून लवकरच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं खुली होतील असं वाटत आहे. अनेकांनी तर याच वर्षी त्याचं पदार्पण होईल असंही भाकीत केलं आहे. पण आयसीसीच्या एका नियमामुळे तसं होणं जरा कठीण आहे.
आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अनेक नियम तयार केले आहेत. यात एक नियम वयाशी संदर्भात आहे. त्यामुळे वैभवला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आयसीसीने वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वयाची मर्यादा आखून दिली आहे. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग कमीत कमी वय हे 15 वर्षे असणं आवश्यक आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी हा फक्त 14 वर्षांचा आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 27 मार्च 2026 रोजी तो 15 वर्षांचा होईल. तेव्हा त्याला कुठे खेळण्याची संधी मिळेल. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वयाची अट नव्हती. पाकिस्तानकडून हसन रजाने फक्त 14 वर्षे आणि 227 दिवसांचा असताना कसोटीत पदार्पण केलं होतं. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे.
आयसीसीच्या नियमात एक पळवाट आहे. वैभव सूर्यवंशी 15 वयापेक्षा कमी असताना टीम इंडियासाठी खेळू शकतो. पण यासाठी बीसीसीआयला आयसीसीकडे साकडं घालावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत क्रिकेट बोर्ड 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची परवानगी देण्यासाठी आयसीसीकडे अर्ज करू शकते. आयसीसी खेळाडूचा खेळण्याचा अनुभव, मानसिक विकास आणि आरोग्य पाहते, त्यानुसार खेळायचे की नाही याबाबत निकाल देते. जर आयसीसीने परवानगी दिली तर कोणताही खेळाडू 15 वर्षांच्या आधी टीम इंडियाकडून खेळू शकतो.
टीम इंडियाकडून सर्वात कमी वयात खेळणारा खेळाडू हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 16 वर्षे आणि 205 दिवसांचा असताना भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. लगेचच पहिला एकदिवसीय सामनाही खेळला. जर वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली तर हा विक्रम मोडू शकतो.