पन्हाळगडाच्या तीन दरवाजासमोरून दुचाकी 30 फूट दरीत कोसळली; युवकांनी दरीत उतरून जखमी महिलेला झोपाळ्यातून काढलं बाहेर
esakal April 30, 2025 04:45 PM

पन्हाळा : ऐतिहासिक (Panhalgad) तीन दरवाजातून पश्चिम भागास जोडणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळून आशा सचिन कुंभार (वय ३५, रा. वाशी, करवीर, मूळ रा. मणेराजुरी, तासगाव) गंभीर जखमी झाल्या. पन्हाळ्यातील युवकांनी दरीत उतरून जखमी महिलेस झोपाळ्यातून वर काढल्याने त्यांना जीवदान मिळाले. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आशा कुंभार आणि त्यांची मैत्रीण पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निवासी शाळेत मुलाला प्रवेश घेण्याबाबत चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. वाशीपासून पन्हाळ्यापर्यंतच्या प्रवासात कुंभार यांच्या मैत्रिणीने दुचाकी चालवली. तर तीन दरवाजातून पुढे शाळेकडे जाताना आशा कुंभार यांनी दुचाकी चालविण्यास घेतली. यावेळी त्यांची मैत्रीण बाजूला उभारली होती. तीव्र उतार व नागमोडी वळणाच्या रस्त्यावर कुंभार यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्या दुचाकीसह रस्त्याच्या संरक्षक भिंतीला धडकून थेट दरीत कोसळल्या.

महिला दरीत कोसळल्याचे समजताच स्थानिक विजय पाटील, राकेश उदाळे, विश्वजित पाटील, सरदार पन्हाळकर, सागर गवंडी, भिमराव कांबळे, अनंत बनगे, शीतल गवंडी, सागर सुतार, नितीन बहादूर, वासिम देसाई या युवकांनी घटनास्थळी घाव घेतली. क्षणाचा ही विलंब न लावता दरीत उतरून जखमी महिलेला कापडाचा झोपाळा करून खांद्यावरून दरीतून वर काढले. त्यांना पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; पण २५ ते ३० फूट दरीत कोसळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथोमोपचार करून पुढील उपचारांसाठी सीपीआर, कोल्हापूर येथे पाठविले.

पर्यटकांनी काढला पळ...

अपघात घडला त्या ठिकाणी पश्चिमेकडील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी नेहमीसारखी आजही पर्यटकांनी गर्दी केली होती. येथे उभ्या असलेल्या पर्यटकांच्या शेजारून दरीच्या दिशेने जाणारी दुचाकी संरक्षक भिंतीवर धडकली, तेव्हा काही काळ ती भिंतीवर लटकत होती. त्यावेळी तेथे असलेल्या पर्यटकांनी दुचाकीला मागे खेचले असते तर ही दुर्घटना घडली नसती; पण हे दृश्य पाहताच पर्यटकांनी तेथून पळ काढला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.