Maharashtra Economy Bigger Than Pakistan: पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत आहे आणि अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2026 साठी पाकिस्तानच्या GDP मध्ये फक्त 2.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2024 साली पाकिस्तानचा एकूण GDP सुमारे 374 अब्ज डॉलर (₹31.9 लाख कोटी रुपये) इतका होता. पाकिस्तान GDP चा मोठा भाग संरक्षणावर खर्च करतो, मात्र त्याची एकूण अर्थव्यवस्था भारताच्या काही राज्यांच्या तुलनेतही लहान आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानचा GDP महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे राज्य आहे. महाराष्ट्राचा GDP 45.31 लाख कोटी रुपये इतका आहे. पाकिस्तानचा GDP सध्या तामिळनाडूच्या जवळपास असल्याचं मानलं जातं.
एप्रिल 22 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण भागात केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातील बहुतेक जण पर्यटक होते. या घटनेची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फोर्स’ (The Resistance Force) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ही संघटना लष्कर-ए-तोयबाची प्रॉक्सी ग्रुप असल्याचं मानलं जातं.
या अमानुष हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापारी संबंध तत्काळ थांबवले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानच्या निर्यातीवर आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक धक्का देत सिंधू जलसंधीवरही फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जल करार 1960 पासून चालू असून, पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. हा करार थांबल्यास पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होऊ शकतं.
आर्थिक संकट गडद होण्याची शक्यताIMF च्या अहवालानुसार, आर्थिक वाढ आधीच मर्यादित आहे. देशातील राजकीय अस्थिरता, महागाई, परकीय गंगाजळीचा तुटवडा, आणि वाढती बेरोजगारी ही आर्थिक घसरणीची प्रमुख कारणं आहेत. यामध्ये भारताशी व्यापार बंद होणं आणि जलसंधी थांबवण्याचा धोका – ही संकटं आर्थिक अस्थिरतेला गती देऊ शकतात.