अक्षय बडवे, पुणे प्रतनिधी
Pune Sassoon Hospital News : शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात याच शिक्षणाचे तीन १३ वाजले आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आता पुण्यातील ससून रुग्णालयाचे बी जे महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालय हे गेल्या काही वर्षांपासून अशाच "गडबड आणि घोटाळे" यांच्यासाठी कुप्रसिद्ध होताना दिसतय. ड्रग्स माफिया ललित पाटील चे याच रुग्णालयातून पलायन असेल किंवा पोर्शे अपघातातील आरोपी अल्पवयीन तरुणाचे रक्त बदलण्याचा प्रकार असे अनेक उदाहरणे देता येतील.
आता याच रुग्णालयाच्या आख्यारीत येणाऱ्या एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात पीडित तरुण हा पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता तसेच संबंधित तरुणाच्या ओळखीबाबत आणि झालेल्या घटनेबाबत माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी केली तक्रार दिल्यानंतर चक्रे ताबडतोब फिरली आणि महाविद्यालय प्रशासनाने ३ विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे.
हा सगळा प्रकार बी जे महाविद्यालयातील अस्थिरोग विभागांतील बद्दल झाला आहे. बी जे महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता अशी तक्रार होती. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली आणि तिथून चक्रे वेगाने फिरली.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी दिलेला माहितीनुसार, "या संपूर्ण प्रकरणाची दखल आम्ही तात्काळ घेतली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळून आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करून त्यांना विद्यालयातील हॉस्टेल मधून काढण्यात आलं आहे. या प्रकरणातील पिढीत तरुणांच्या कुटुंबीयांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना तक्रार केल्यानंतर विभागाने बसून रुग्णालयाला मेलवर कारवाईच्या सूचना दिल्या. यानंतर आम्ही एक अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तीन विद्यार्थ्यांचे निलंबन केलं आहे."