Maharashtra Live Update : पहलगाम हल्ल्याप्रकरणी गृहमंत्रालयावर कारवाई करा - संजय राऊत
Sarkarnama April 30, 2025 04:45 PM
पहलगाम हल्ल्याप्रकरणी गृहमंत्रालयावर कारवाई करा - संजय राऊत

जम्मू-कश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयाची होती. त्यामुळे या हल्ल्यात नुसत्या बैठकी घेऊन उपयोग नाही. आधी पाकिस्तावर हल्ला करा आणि कश्मीरमधील हल्ला रोखण्यास अपयशी ठरलेल्या गृहमंत्रालयावर कारवाई करा, अशी मागणी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

येत्या 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ला करणार - पाकिस्ताना मंत्र्याने व्यक्त केली भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तानी माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पत्रकार परिषद घेत 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तावर हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली. हल्लाबाबत आमच्याकडे विश्वसनीय माहिती असल्याचे त्यांनी म्हटले.

Kolkata Hotel Fire : कोलकातामधील हॉटेलला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू

मंगळवारी रात्री कोलकाता येथील फलपट्टी मच्छुआ भागातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाच्या मदतीने 22 जणांना वाचवण्यात आलं आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune News : पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग

पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची माहिती आहे. दरम्यान, थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे.

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे महत्वाचे आदेश

परभणी येथील संविधान अवमान केल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत अंतिम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 मे रोजी होणार आहे.

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले असता, एक बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

Justice Bhushan Gavai : न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून गवई यांच्या नावाला परवानगी दिली. त्यानुसार आता ते 14 मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.

Radhakrishna vikhe patil : राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.