Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्याचे धोरण स्वीकारले आहे. कोकण, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईमध्ये माजी नगरसेवक तसेच ठाकरेंच्या शाखा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होतो आहे. या प्रवेशामागे शिंदेंचे मिशन महापालिका निवडणूक असल्याचे त्यांनी स्वतःच कबूल केले आहे.
ठाणे शहरात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. त्यावेळी 'अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवरही भगवा डौलाने फडकेल', असे म्हणत शिंदेंनी महापालिका निवडणुकीची तयारी आत्तापासूनच केली असल्याचे संकेत दिले.
ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप विभागप्रमुख प्रितम राजपूत, उप विभागप्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखाप्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमकुवत करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतही ठाकरे बॅकफूटवर?मुंबई पालिकेचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता दळवी यांनी देखील नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील फूटीनंतर देखील मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी मोठी साथ दिली होती. मात्र, आता तब्बल 45 ते 50 माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे तसेच आपल्या पक्षात प्रवेश केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नवी मुंबईतही ठाकरेंना धक्कानवी मुंबईत देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी राहिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या माजी नगरसवेकांची चलबीचल सुरू होती. अखेर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील माजी नगरसेवक असे मिळून 13 नगरसेवक हे शिंदेंसोबत गेले. त्यामुळे नवी मुंबईत देखील शिंदेची शिवसेना मजबूत झाली आहे.