टीम इंडियाला 2 आयसीसी ट्रॉफी आणि मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याचा आज 30 एप्रिलला वाढदिवस आहे. रोहित शर्मा 38 वर्षांचा झाला आहे. रोहित शर्माला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. रोहितने खेळाडू आणि कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये आपली छाप सोडली आहे. रोहित त्याच्या फटकेबाजीसाठी हिटमॅन म्हणूनही ओळखला जातो. सर्वांच्या लाडक्या रोहित शर्माच्या या वाढदिवसानिमित्ताने त्याने आयपीएलमध्ये केलेल्या 5 महारेकॉर्ड्सबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
रोहितने आजपासून 18 वर्षांआधी वयाच्या 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. रोहितने डेक्कन चार्जर्सकडून आयपीएल पदार्पण केलं. रोहितने 2009 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. तसेच रोहितने आयपीएलमध्ये 2023 साली 6 हजार धावा पूर्ण केल्या. रोहित यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 6 हजार धावा आणि हॅटट्रिक घेणारा एकमेव खेळाडू आहे.
रोहित शर्मा आयपीएल फायनलमध्ये 2 वेळा अर्धशतक झळकावलं आहे. रोहित अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार आहे. रोहितने 2015 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 26 चेंडूत 5 धावा केल्या होत्या. तसेच 2020 साली दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध अंतिम सामन्यात 51 चेंडूत 68 धावांचं योगदान दिलं होतं.
रोहित शर्मा याला नुकतंच आयपीएल 2025 मध्ये चेन्नई विरुद्ध केलेल्या 76 धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. रोहितची ही आयपीएलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची 20 वी वेळ ठरली. रोहितने यासह मोठा विक्रम केला. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात पहिला यशस्वी कर्णधार आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिलीय. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने रोहितच्या या विक्रमाची बरोबरी केली. धोनीनेही त्याच्या नेतृत्वात सीएसकेला 5 वेळा चॅम्पियन केलंय. तसेच रोहित एकूण 6 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे. रोहितने मुंबईआधी डेक्कन चार्जसचं प्रतिनिधित्व केलंय. डेक्कन चार्जर्सने 2009 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. रोहित त्या संघाचा सदस्य होता. रोहित व्यतिरिक्त अंबाती रायूडुने यानेही ही कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा याने आतापर्यंत अनेकदा स्फोटक आणि झंझावाती खेळी केली आहे. रोहितच्या फटकेबाजीचे अनेक चाहते आहेत. रोहितने आतापर्यंत अनेक मोठे फटके लगावले आहेत. त्यामुळेच रोहितला हिटमॅन असंही म्हटलं जातं. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहितने आतापर्यंत 297 सिक्स लगावले आहेत.