8237
कागल : येथे ‘कृत्रिम बुद्धिमता आधारित ऊस उत्पादन तंत्र’ या विषयावरील चर्चासत्रावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे. व्यासपीठावर अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक व जितेंद्र चव्हाण.
............
‘एआय’साठी शाहू कारखाना प्रोत्साहन देणार
समरजितसिंह घाटगे ः एआयच्या माहितीपर चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३० : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरणारी एआय तंत्रप्रणाली शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत,’ असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यावतीने ‘कृत्रिम बुद्धिमता आधारित ऊस उत्पादन तंत्र’ या विषयावरील चर्चासत्रावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य साखर संघाच्या संचालिका व कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.
घाटगे म्हणाले, ‘स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी संशोधन केंद्रातील अद्यावात तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याची निर्माण केलेली परंपरा त्यांच्या पश्चात अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाहू’ने कायम राखली आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून एआय तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणार आहोत. इच्छूक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करावी.’
कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे म्हणाले, ‘एकीकडे उसाचा उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ऊसशेती किफायतशीर न होता तोट्याची बनत चालली आहे. ऊस उत्पादनवाढीच्या अचूक नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्वमशागतीपासून तोडणीपर्यंतचे अचूक नियोजन उपग्रह प्रणालीद्वारे करता येते. त्याच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था व तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.’
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील, शिवानंद माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.
......
चौकट...
एआय शेतकरी, कारखान्यासही उपयुक्त
मर्यादित असलेल्या ऊस क्षेत्रात उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविल्याशिवाय ऊसशेती परवडणार नाही. एआय तंत्रामुळे उत्पादन खर्चात बचत होते, तर उसाच्या उत्पादनासह साखरेच्य उताऱ्यात वाढ होते. त्यामुळे शेतकरी व कारखाना अशा दोन्ही घटकांना हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन घाटगे यांनी केले.