वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या सरकारने स्वत:च्या देशाच्या संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा केली. दहशतवाद विरोधातील कारवाईत आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना पकडण्यास भारताला आमचे पूर्ण समर्थन असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले आहे.
कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी याप्रकरणी योग्यप्रकारे तपास करावा आणि गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. एक भयानक दहशतवादी हल्ला झाला असून पाकिस्तानने तपासात भारत सरकारला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करत असल्याचे हाउस ऑफ कॉमन्समध्ये विदेश कार्यालयाचे मंत्री हॅमिश फाल्कनर यांनी म्हटले आहे.
फाल्कनर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधीच्या चर्चेदरम्यान बोलत होते. लेबर पार्टीचे खासदार गुरिंदर सिंह जोसन यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल ब्रिटिश सरकारची भूमिका कोणती असा प्रश्न विचारला होता. भारताला स्वत:च्या सुरक्षेची चिंता असणे स्वाभाविक आहे, कारण ही एक भयानक घटना आहे. भारत या हल्ल्याचा तपास करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून यात ब्रिटनचे समर्थन मिळणार असल्याचे फाल्कनर यांनी सांगितले. तर ब्रिटनच्या सुरक्षा यंत्रणांना या हल्ल्यामागे कोण आहे हे माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. पाकिस्तान आणि भारताच्या दूतावासाला ब्रिटन सरकारकडून पूर्ण सुरक्षा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद पेले.