उन्हाळ्याचा सीझन म्हणजे घामाच्या नुसत्या धारा. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण या काळात संतुलित ठेवणे फार गरजेचे आहे. जसजसे उष्णतेचे प्रमाण वाढू लागते तसतसे त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचेही प्रमाण वाढू लागते. यासाठीच आपल्या शरीराला या काळात थंड ठेवणे खूप महत्वाचे आहे. प्रखर उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची थंड पेये पितात. त्यात नारळपाणी देखील समाविष्ट आहे. नारळपाणी शरीराला थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक पेय म्हणून काम करते. उन्हाळ्यात, लोक शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी शहाळ्याचे सेवन करतात. पण शहाळे हे शरीर थंड ठेवण्यापुरते मर्यादित नाही. जर तुम्ही उन्हाळ्यात दररोज सकाळी शहाळे प्यायले तर तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. जाणून घेऊयात या आरोग्यदायी फायद्यांबद्दल.
उन्हाळ्यात घामामुळे शरीर खूप लवकर डिहायड्रेट होते. पण शहाळ्याचे पाणी हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. हे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांनी समृद्ध असते जे शरीराला पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.
शहाळ्याच्या पाण्यात कॅटालेस, पेरोक्सिडेस सारखे बायोटिक एंजाइम आढळतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. पोट फुगणे, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास देखील हे मदत करते. रिकाम्या पोटी याचे सेवन करणे अधिक प्रभावी मानले गेले आहे.
शहाळे हे त्याच्या अँटिऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने रात्रभर शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत होते.
जर तुम्ही या उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नारळ पाणी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. नारळाच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे त्याचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच त्यात फॅट्स नसल्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवत नाही.
उन्हाळ्यात घामामुळे, डिहायड्रेशनमुळे त्वचा खूपच निस्तेज आणि निर्जीव होते. पण जर तुम्ही दररोज सकाळी नारळ पाणी प्यायले तर यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहील. तिच्यावर एक टवटवीतपणा येईल. नारळाच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला आतून निरोगी बनवतात.
रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही शहाळ्याचे पाणी फायदेशीर आहे. या पाण्यात पोटॅशियम आढळते. जे सोडियम काढून टाकण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.
हेही वाचा : Shami Plant : शनिदेवाच्या कृपेसाठी घरात लावा हे रोप
संपादित – तनवी गुडे