कोल्हापूर : मुंबईत नोकरी करणाऱ्या तरुणाने पुण्यातील एकाच कंपनीत काम करणाऱ्या, एकाच गावातील जिवलग मैत्रिणींना इन्स्टाग्रामवरून प्रेमात ओढले. पहिल्या मुलीसोबत प्रेमसंबंध असताना तिच्या मैत्रिणीसोबत लग्न केले. प्रेमविवाह (Love Marriage) करून तो करवीर ठाण्यात (Karveer Police Station) हजर झाला. मात्र, याचवेळी पहिली प्रेयसीही पोलिस ठाण्यात पोहोचली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दोघींना फसवल्याचे स्पष्ट झालेच. शिवाय प्रेयसीने लग्नाच्या आमिषाने फसवणूक करून बलात्कार केल्याची तक्रार दिल्याने संबंधिताची ‘वरात पोलिस ठाण्यातून आता कारागृहाकडे’ होणार आहे. संशयित ओंकार उत्तम प्रधान (वय २४) हा मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने २०२२ पासून पुण्यातील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीसोबत ओळख होती.
तिला लग्नाचे आमिष दाखवून पन्हाळा येथील हॉटेल तसेच पुण्यातील तिच्याच खोलीवर शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यानच्या काळात त्याने त्याच मुलीच्या दुसऱ्या मैत्रिणीलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकाचवेळी तो दोघींची फसवणूक करीत होता. या दुसऱ्या मुलीशी लग्न करून तो थेट करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनीही दोघांचे वय पूर्ण असल्याने पालकांना लग्नाविषयी कळवले.
मैत्रिणीने गाठले पोलिस ठाणे...संशयित ओंकार प्रधान याने आपल्याच मैत्रिणीसोबत लग्न केल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. तीही पुण्याहून थेट करवीर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिने घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना सांगितले. संशयिताने लग्न केलेल्या मुलीची आई व भाऊ यांनीही पोलिसांना विनवणी करून आपल्या मुलीला यातून बाहेर काढा, अशी विनवणी केली. पोलिसांनी पीडित मुलीची मानसिकता विचारात घेऊन तिची काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. यावर तिने फसवणूक झाल्याचे सांगितल्याने याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) फिर्याद दाखल करण्यास सांगितले. यावरून संशयिताविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.