अयोध्या : अयोध्येतील हनुमान गढीचे मुख्य पुजारी महंत प्रेमदास यांनी रामजन्मभूमीवरील मंदिरात जाऊन बुधवारी दर्शन घेतले. गढी परिसराच्या बाहेर जाणारे ते पहिले मुख्य पुजारी ठरले.
दास यांची शाही मिरवणूक काढत त्यांना रथात बसवून राम मंदिरामध्ये दर्शनासाठी नेण्यात आले. हजारो नागा साधू आणि भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. तसेच या मिरवणुकीत हत्ती घोडे, उंट आणि स्थानिक वाद्यवृंदाचाही समावेश होता. महंत प्रेमदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वप्रथम शरयू नदीमध्ये स्नान केले तसेच धार्मिक विधीही केले. त्यानंतर प्रेमदास यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
निर्वाणी आखाड्याचे मुख्य महंत रामकुमार दास यांनी सांगितले की, मुख्य पुजारी महंत प्रेमदास यांची अयोध्या मंदिराला भेट देण्याची तीव्र इच्छा होती, त्यामुळे निर्वाणी आखाड्याच्या पंचांनी त्यांना आयुष्यात एकदाच हनुमानगढीचा परिसर सोडून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हनुमान गढीतच निवासजी व्यक्ती हनुमान गढीचा महंत होते, त्या व्यक्तीला हनुमान गढीचा ५२ बिघे परिसर सोडून जाण्याची परवानगी नसते. मागील अनेक दशकांपासून ही परंपरा पाळली जात आहे. इतकेच नव्हे प्रशासनाच्या वतीने देखील या नियमाचे पालन केले जाते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी हनुमान गढीच्या मुख्य पुजाऱ्यांच्या ऐवजी त्यांचा प्रतिनिधी न्यायालयात उपस्थित राहतो. त्याचप्रमाणे गरज पडल्यास हनुमान गढीमध्येच सुनावणी घेण्यात येते, १९८०मध्ये अशाच पद्धतीने हनुमान गढीमध्ये सुनावणी घेण्यात आली होती.अशी माहिती निर्वाणी आखाड्याकडून देण्यात आली.
मारुतीरायांचा स्वप्नदृष्टांतस्थानिक मान्यतेनुसार अयोध्येमध्ये श्रीरामांनी अवतारकार्य समाप्त केल्यानंतर मारुतीरायांना येथील राज्याची जबाबदारी दिली होती. आणि येथील हनुमान गढी येथील मुख्य पुजारी हे त्यांचे प्रतिनिधी मानले जातात. त्यामुळेच बाबा अभयदास यांनी घालून दिलेल्या नियमावली नुसार दोन दशकांपेक्षा अधिककाळापासून येथील मुख्य पुजारी हे मारुतीरायांचे प्रतिनिधी असल्याने ते गढीचा परिसर कधीच सोडत नाहीत.
अलीकडील काळात आरोग्याच्या कारणासाठी एकदाच एका मुख्य पुजाऱ्यांनी गढीचा परिसर सोडला होता. दरम्यान, ‘महंत प्रेमदास यांना मारुतीरायांचा दृष्टांत झाला आणि त्यांनी प्रेमदास यांना अयोध्येतील राममंदिरामध्ये येण्याचा आदेश दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला’ दावा केला जात आहे.