Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचा ताणले आहेत. या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तावर हल्ला करू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कराकडून युद्धाभ्यासही केला जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्ताननेदेखील भारताने हल्ला केलाच तर आम्ही त्याला थेट प्रत्युत्तर देऊ, अशी भूमिका बोलून दाखवली आहे. असे असतानाच आता पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय संघर्षाने तोंड बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी लष्कर प्रमुखांविरोधातही तेथील नागरिकांनी भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतासोबतच्या युद्धाच्या शक्यतेनंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्षाने तोंड वर काढले आहे. तेथील राजकीय संघर्षही उफाळून आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तुरुंगात आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. भारतासोबतचा संघर्ष तीव्र झाल्यानंतर आता इम्रान खान यांची सुटका करण्याची मागणी केली जात आहे. एक्स या समाजमाध्यमावर साधारण 34 लाख ट्विट्स करण्यात आले आहेत. याच ट्विटच्या माध्यमातून इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करावी, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एका प्रकारे राजकीय संघर्षच उभा राहिल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानमध्ये लष्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाकिस्तानच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतही तेथील लष्कराचा सहभाग असतो. विशेष म्हणजे लष्करप्रमुखाने अनुकूल भूमिका घेतली तरच कोणताही राजकीय निर्णय घेतला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. असे असताना याच लष्कर प्रमुखाला खुर्चीवरून खाली खेचण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असिम मुनीर हे आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनीच असीम मुनीर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतरच इम्रान खान यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. पुढे त्यांना तुरुंगातही जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर असीम मुनीर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव असला तरी कोणत्याही क्षणी युद्ध चालू होते की काय? अशी शक्यता व्यक्तक केली जात आहे. आमचे सैन्य तयार आहे, असे दोन्ही देशांकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.