Pahalgam Terror Attack: "आम्हाला गोळ्या नको, भाकरी हव्यात..."; पाकिस्तानातील जनता त्रस्त, अमेरिकन अहवालाने खळबळ
esakal May 03, 2025 04:45 AM

पाकिस्तान सध्या युद्धाच्या तयारीच्या गदारोळात आहे. भारतासोबतच्या सीमेवर तणाव वाढत आहे, लष्करी ताफे सीमावर्ती भागांकडे सरकत आहेत, लढाऊ विमाने आकाशात गर्जना करत आहेत, आणि सरकारी वाहिन्यांवर युद्धाच्या शक्यतांवर चर्चा जोरात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कठोर संदेश सातत्याने येत आहेत. पण या सगळ्या घोषणांमध्ये पाकिस्तानातील सामान्य जनता एकच प्रश्न विचारत आहे - "आम्हाला गोळ्या नको, भाकरी हव्यात!"

आर्थिक संकट आणि युद्धाची भीती

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. महागाई, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेमुळे जनता त्रस्त आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, इस्लामाबादमधील 21 वर्षीय विद्यार्थिनी तहसीन जहरा म्हणते, "आम्ही आधीच आर्थिक संकट आणि राजकीय अराजकतेने हैराण आहोत. त्यात आता युद्धाच्या धमक्या! हे सगळं भयावह आहे. आम्हाला युद्ध नको, शांतता हवी." तहसीनसारखे हजारो तरुण आपल्या भवितव्यासाठी चिंतेत आहेत. जनतेचा असंतोष सरकार आणि लष्कराविरुद्ध वाढत आहे.

लष्करावरील विश्वास उडाला

पूर्वी संकटकाळात एकजुटीचे प्रतीक मानले जाणारे पाकिस्तानी लष्कर आता टीकेच्या केंद्रस्थानी आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून हटवणे आणि त्यांच्या समर्थकांवर झालेल्या दडपशाहीमुळे लष्कराविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाच्या माजी खासदार आलिया हमजा म्हणतात, "जर जनतेचा पाठिंबाच नसेल, तर युद्धात कोण लढणार? लष्कराने पुन्हा लोकांचा विश्वास मिळवावा लागेल." अनेक तरुण लष्कराच्या राजकीय हस्तक्षेप आणि मानवाधिकार हननावर नाराज आहेत.

पर्यटन उद्योग ठप्प

नीलम व्हॅली आणि केरनसारख्या भागांत सन्नाटा पसरला आहे. पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. केरनमधील पर्यटन व्यवसाय चालवणारे राजा अमजद म्हणतात, "अधिकृत बंदीची गरजच नाही, लोक भयानेच येत नाहीत." दुसरीकडे, अथ्माकममधील 40 वर्षीय सादिया बीबी आपल्या मुलांसाठी घरामागे बंकर तयार करत आहेत. "अजून गोळीबार झाला नाही, पण कधी होईल हे कोणालाच माहीत नाही," त्या म्हणतात.

तरुणांचे देश सोडण्याचे स्वप्न

तील अनेक तरुण आता देश सोडण्याचा विचार करत आहेत. इस्लामाबादमधील 31 वर्षीय जारा खान म्हणतात, "इथे आयुष्य खूप कठीण आहे. नोकरी नाही, संसाधने नाहीत, आणि कुटुंब चालवण्याची कल्पनाही करू शकत नाही." त्यांना देशात राहणे आता ओझ्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत युद्धाची भाषा करणे मूर्खपणाचे वाटते.

राजकीय आणि आर्थिक संकटात अडकलेला देश

पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वातील मतभेद, विरोधी नेत्यांवरील दडपशाही आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे देश गंभीर संकटात सापडला आहे. युद्धाच्या धमक्यांनी जनता आणखी भयभीत आणि निराश झाली आहे. सामान्य लोकांची मागणी स्पष्ट आहे - "आम्हाला युद्ध नको, नारेबाजी नको; आम्हाला भाकरी, दिलासा आणि शांतता हवी!"

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.