गुहागर : आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधवांमधल्या हळव्या पित्याचे रूप पाहावयास मिळाले. गेली आठ वर्ष ही मुलगी आमदार (Bhaskar Jadhav) यांच्या घरी कामाला होती. जाधव कुटुंबाने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलेल्या या मुलीचे नुकतेच लग्न झाले. तिच्या लग्नानंतर (Marriage) जाधव कुटुंबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आली त्या वेळी तिला निरोप देताना जाधव यांना अश्रू अनावर झाले.
गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार जाधव यांच्या घरी गेली आठ वर्षे कामाला होती. सुप्रियाचे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेपासून ते लग्न होईपर्यंत सर्व टप्प्यावर जाधव कुटुंबाचा सहभाग होता. काल (ता. १) सुप्रियाच्या लग्नाला संपूर्ण जाधव कुटुंब पांगारी सडेवाडीत आले होते.
विवाह झाल्यानंतर आमदार जाधव, सुवर्णावहिनी, सून स्वराताई यांना भेटण्यासाठी आली असता सुवर्णावहिनांना मिठी मारून रडू लागली. हे पाहून शेजारी उभे असलेले आमदार भास्कर जाधव यांना देखील अश्रू अनावर झाले. सुप्रियाचे वडील मानाचा नारळ आमदारांना देण्यासाठी आले; मात्र आमदार रडत असल्याचे पाहून तेही गहिवरले.
सुप्रियाच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना सुप्रिया माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या' असे सांगितले.