Ayush Mhatre : “..नाव लक्षात ठेवा”, तोडफोड खेळीनंतर सूर्यकुमारची आयुष म्हात्रेसाठी खास पोस्ट
GH News May 04, 2025 06:05 AM

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सचा युवा आणि पदार्पणवीर आयुष म्हात्रे याची त्याने केलेल्या शानदार खेळीनंतर पाठ थोपाटली होती. त्यानंतर सूर्याने आता आयुषसाठी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट करत त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. आयुषने 3 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 214 धावांचा पाठलाग करताना 94 धावांची स्फोटक खेळी केली. सूर्याला आयुषची ही खेळी इतकी भावली की त्याने सोशल मीडियावर त्याच्यासाठी एक पोस्ट लिहीली. सूर्याने एका वाक्यात पोस्ट करत आयुषबाबत खूप काही म्हटलं.

सूर्यकुमार यादवची पोस्ट

“शौर्यपूर्ण आणि फायर खेळी! भविष्य इथे आहे. नाव लक्षात ठेवा”, अशी पोस्ट सूर्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. सूर्याची ही एक वाक्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सूर्याने याआधीही आयुषने मुंबई इंडियन्स विरुद्ध केलेल्या खेळीसाठी त्याला शाबासकी दिली होती. आयुषने वानखेडे स्टेडियममध्ये 20 एप्रिलला मुंबई विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. आयुष म्हात्रे याने त्या सामन्यात घरच्या मैदानात 15 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्ससह 32 रन्स केल्या होत्या.

आयुषची आरसीबी विरुद्धची खेळी

आरसीबीने 214 धावांचं आव्हान ठेवल्याने चेन्नईला स्फोटक आणि झंझावाती सुरुवातीची गरज होती. आयुषने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि चेन्नईला तोडू सुरुवात मिळवून दिली. आयुषने शेख रशीद याच्यासह सलामी अर्धशतकी भागीदारी केली. तर अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यासह शतकी भागीदारी केली. आयुषने शेख रशीदसह 58 धावा जोडल्या. त्यानंतर चेन्नईने झटपट 2 विकेट्स गमावल्या. रशीद 14 आणि समॅ करन 5 रन्स करुन आऊट झाले. त्यामुळे चेन्नईची 2 बाद 58 अशी स्थिती झाली.

सूर्याचं आयुषसाठी ट्विट

त्यानंतर रवींद्र जडेजा याच्या सोबतीने युवा आयुषने चेन्नईचा डाव सावरला आणि मजबूत स्थितीत आणून ठेवलं. आयुषने जडेजासह तिसऱ्या विकेटसाठी 114 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर आयुष आऊट झाला. आयुषने 5 षटकार आणि 9 चौकारांसह 94 धावा केल्या. आयुषने केलेल्या या खेळीमुळे चेन्नईने सामन्यातील आपलं आव्हान कायम ठेवलं. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. आयुषने त्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आता रवींद्र जडेजा, कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि ऑलराउंडर शिवम दुबे ही जोडी चेन्नईला विजयी करतील, अशी आशा होती. मात्र चेन्नईला विजयी होता आलं नाही. आरसीबीने चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 211 रन्सवर रोखलं. आरसीबीने यासह 2 धावांनी सामना जिंकला. आरसीबीचा हा या मोसमातील नववा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.