इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शनिवारी (३ मे) खेळला जात आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात रोमरिओ शेफर्ड, विराट कोहली आणि जेकॉब बेथल यांनी आक्रमक फलंदाजी केली. बंगळुरूने २१४ धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले आहे.
दरम्यान, चेन्नईला गेल्या काही वर्षात १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले आहे. तसेच चेन्नईने चिन्नास्वामीवर सर्वोच्च २०६ धावांचा यापूर्वी यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे आता त्यांना हा सामना जिंकायचा असेल, तर विक्रमी कामगिरी करावी लागणार आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंगळुरूकडून जेकॉब बेथल आणि विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी सुरुवात आक्रमक केली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये मोठे शॉट्स खेळत धावा जोडण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान मथिशा पाथिराना आणि रवींद्र जडेजा यांच्यात झेल घेताना धडक झाल्याने २८ धावांवर बेथलला जीवदान मिळाले. याचा त्याने फायदा घेतला. बेथलने आधी अर्धशतक पूर्ण केले.
पण अखेर या दोघांची ९७ धावांची भागीदारी झाली असताना बेथलला मथिशा पाथिरानाने डेवाल्ड ब्रेविसच्या हातून झेलबाद केले. बेथलने ३३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. विराटनेही नंतर २९ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे हंगामातील सातवे, तर सलग चौथे अर्धशतक आहे.
तो पुढेही चांगला खेळत होता. पण १२ व्या षटकात त्याला सॅम करनने खलील अहमदच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. विराटने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली.
पण तो बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल १७ धावांवर आणि रजत पाटिदारला ११ धावांवर पाथिरानाने बाद केले. जितेश शर्माही ७ धावा करून नूर अहमदच्या गोलंजाजीवर ब्रेविसकडे झेल देत विकेट गमावली. मात्र १९ वे षटक वादळी ठरले. रोमारिओ शेफर्डने ४ षटकार आणि २ चौकार मारले. त्यामुळे मोठी धावसंख्येकडे आगेकुच केली.
त्याने शेवटच्या षटकातही आक्रमक खेळ केला. त्याने १४ चेंडूत अर्धशतक करत बंगळुरूला २० षटकात ५ बाद २१३ धावांपर्यंत पोहचवले केल्या. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.
चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने ३ विकेट्स घेतल्या. नूर अहमद आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.