- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
परदेशात शिक्षण घेणे ही अनेक विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत गोष्ट असते. उच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दृष्टिकोन, आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्यासाठी परदेशात शिक्षण घेणे फायदेशीर ठरते. मात्र, या प्रवासासाठी योग्य तयारी आणि नियोजन आवश्यक असते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेऊया परदेश म्हणजे फक्त अमेरिका नव्हे! सध्याच्या परिस्थितीत उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे अवघड होऊन बसले आहे!
शैक्षणिक आणि व्यावसायिक ध्येय निश्चिती
परदेशात शिक्षणासाठी सर्वप्रथम तुमची उद्दिष्टे स्पष्ट असावीत. तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची नीट योजना करा. फक्त शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे का तिथे स्थायिक होण्याचा मार्ग म्हणून परदेशी शिकायचे आहे हेही तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या मनात निश्चित असू द्यात. बारावीनंतर जायचे असल्यास आपले प्रोफाइल उत्तर तयार करा. त्यासाठी२-३ वर्षं आधीच तयारी करावी लागते.
योग्य विद्यापीठ आणि अभ्यासक्रम
तुमच्या शैक्षणिक गरजेनुसार विद्यापीठ आणि अभ्यासक्रम निवडा. विद्यापीठाचा दर्जा, कोर्सची रचना, आणि नोकरीच्या संधी या गोष्टींचा विचार करा. ‘क्यूएस’ वर्ल्ड रँकिंग आणि इतर स्रोतांचा उपयोग करून योग्य विद्यापीठ निवडा. अर्थात आपल्या शैक्षणिक कुवतीनुसार आपल्याला तिथले विद्यापीठ शोधायला लागेल. काही लोक काहीही करून परदेशी जायचे आहे, मग मिळेल तिथं प्रवेश आणि मिळेल तो विषय असेही करतात!
भाषा आणि प्रवेश चाचणीसाठी तयारी
बहुतेक परदेशी विद्यापीठांमध्ये TOEFL, IELTS, किंवा GRE/GMAT यांसारख्या चाचण्यांची आवश्यकता असते. या चाचण्यांसाठी वेळेवर तयारी सुरू करा. इंग्रजी भाषेची योग्य तयारी करा, कारण ती परदेशात शिक्षणासाठी अत्यावश्यक आहे.
शिष्यवृत्ती आणि आर्थिक नियोजन
परदेशात शिक्षण खर्चिक असते. त्यामुळे शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, आणि आर्थिक साहाय्य यासंबंधी माहिती मिळवा. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वेळेत अर्ज करा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवा. सध्याच्या परिस्थितीत शिष्यवृत्ती मिळणे अवघड होऊ लागले आहे.
प्रवास आणि व्हिसा प्रक्रिया
तुमच्या निवडलेल्या देशाच्या व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीचे वेळापत्रक, आणि इतर प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही निवडलेल्या विद्यापीठाकडून ऑफर लेटर मिळाल्यावर लगेच व्हिसा प्रक्रियेची तयारी करा.
सांस्कृतिक जुळवाजुळवी आणि मानसिक तयारी
नवीन देशाची भाषा, संस्कृती, आणि जीवनशैली यांची माहिती घ्या. वेगळी संस्कृती आत्मसात करण्यासाठी मनापासून तयारी ठेवा. स्वयंपाक, घरकाम, आणि आर्थिक व्यवस्थापनासारख्या कौशल्यांचा सराव करा. ‘मला साधा चहा सुद्धा करता येत नाही’ हा कौतुकाचा विषय नाही!
नेटवर्किंग आणि वेळेचे नियोजन
विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये सामील व्हा आणि व्यावसायिक नेटवर्क तयार करा. वेळेचे नियोजन करून अभ्यास आणि सामाजिक जीवन यांचा समतोल साधा. तिथे कोणी ओळखीचं आहे का, त्याचा शोध घ्या. ओळख नसेल तर ओळख काढा! तिथं गेल्यावर हीच सपोर्ट सिस्टिम असते.
निष्कर्ष
परदेशात शिक्षण घेण्यासाठी योग्य तयारी, दृढ निश्चय, आणि शिस्त यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास नक्कीच यशस्वी होता येईल. तुमच्या स्वप्नांच्या प्रवासासाठी पहिले पाऊल उचला आणि भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी साधा!