जिज्ञासा कायम ठेवा!
esakal May 07, 2025 01:45 PM

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

‘The important thing is not to stop questioning. Curiosity has its own reason for existence.’

- Albert Einstein

आमची एक भाची आहे. वय वर्षे २ जेमतेम. बोलायला यायला लागले तशी तिने ‘हे काय आहे?’ या प्रश्नाचा धोशा लावला. काहीही दिसले की ती हा प्रश्न विचारायची. विशेषतः रंगीत, आकर्षक, नजरेस चटकन पडतील असे पदार्थ, वस्तू, फुले, फळे, पाने, आदी. उत्तर देताना नाकी नऊ यायचे. मला प्रश्न पडायचा, आत्ताशी तर कुठे सुरुवात आहे. अजून तर हिचे जगणे सुरू व्हायचे आहे.

आयुष्याच्या अंतापर्यंत पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तिला मिळतील? सर्व प्रकारची कुतूहल शमवणारी प्रयोगशाळा, सहजी उपलब्ध होईल? की, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नकोस, आपण आपल्या मर्यादेत रहावे! उगाच भोचकपणा करू नकोस, फार शहाणी समजतेस का स्वतःला? या अशा शब्द प्रयोगांनी तिच्या कुतूहलाचा गळा घोटला जाईल?

अशा भाच्यांना नाउमेद न होता प्रश्न विचारण्याचे, योग्य ते कुतूहल बाळगण्याचे आणि उत्तरे शोधण्यासाठी बळ दिले पाहिजे. जिज्ञासा जागृत कशी राहील अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. निर्भय होऊन प्रश्न विचारण्याचे धाडस कर, असा आत्मविश्वास दिला पाहिजे. उत्तरे दिली पाहिजेत अशी मानसिकता निर्माण होईल इतपत संयमी, संवेदनशील समाज निर्माण व्हायला हवा.

त्याची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून व्हावी. आपल्याच शाळेचे विद्यार्थी ओळखू येण्यासाठी त्यांच्या अंगावर एक गणवेश चढवण्यात येतो. तो जणू मनावरच चढवला जातो. मग कसे छान एकसाची होऊन जाते.

भर दिवसा सूर्यप्रकाशात कंदील पेटवून, रहदारीच्या रस्त्यावर ‘तुम्ही ईश्वराला पाहिलेत का? तो तुम्हाला भेटलाय का?’ असे प्रश्न विचारणारा, जर्मन विचारवंत फ्रेडरिक नित्शेच्या बोधकथेतील वेडा माणूस जोपर्यंत जिवंत आहे, प्रश्नांची उत्तरे शोधण्याची अविश्रांत ऊर्मी जोपर्यंत शिल्लक आहे.

तोपर्यंत माणसाची उमेद कायम राहील. अन्यथा सगळे एकसाची, सपाट होऊन जाईल. पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, या आदीम भ्रमांपर्यंत आपल्याला उलटा प्रवास सुरू करायचा नसेल तर कुतूहल जागृत ठेवायलाच पाहिजे.

प्रश्नांना जरूर उत्तरे मिळतील मिळतील असे भयमुक्त वातावरण कायम ठेवायला हवे. प्रश्नांची योग्य, विवेकी, सकारात्मक उत्तरे मिळू शकतील अशी व्यक्तिमत्त्वे निर्माण होतील आणि टिकतील, अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.