VIDEO : हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टीची निर्घृण हत्या; मंगळूरमध्ये पुन्हा रक्तपात, शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर
esakal May 03, 2025 02:45 PM

बंगळूर : हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी (Hindutva Activist Suhas Shetty) याची हत्या केल्याने मंगळूरमध्ये पुन्हा रक्तपात झाला आहे. सुहासच्या हत्येनंतर मंगळूर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. परिस्थिती संवेदनशील असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळूर जिल्हा (दक्षिण कन्नड) बंदचा आदेश जारी केला आहे.

२०२२ मध्ये सुरतकल्ल येथील फाझिल हत्याकांडातील (Fazil Massacre) मुख्य आरोपी आणि गुन्हेगार सुहास शेट्टीची गुरुवारी रात्री ८.२७ च्या सुमारास मंगळूरच्या बाहेरील बाजपे ठाण्याच्या (Mangalore Police Station) हद्दीतील किन्निपाडवू येथे निर्घृण हत्या करण्यात आली.

सुहास शेट्टी हा पूर्वी बजरंग दलाचा कार्यकर्ता होता आणि त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गुन्हे दाखल होते. हिंदू कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी २८ जुलै २०२२ रोजी फाझिलची हत्या करण्यात आली. याप्रकरणात सुहास शेट्टी हा मुख्य आरोपी होता.

सुहासच्या हत्येची बातमी कळताच मंगळूर दक्षिणचे भाजप आमदार वेदव्यास कामत ए. जे. मंगळूर येथील रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जमले होते. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मंगळूर शहराचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले, ‘ही घटना रात्री ८.२७ वाजता घडली. संजय, प्रज्वल, अन्वित, लतीश आणि शशांक यांच्यासह वाहनातून प्रवास करणाऱ्या सुहास शेट्टीला दोन मोटारीतून आलेल्या काही गुंडांनी अडवले. पाच ते सहा हल्लेखोरांनी सुहास शेट्टीवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. ज्यात सुहास शेट्टी गंभीर जखमी झाला. त्याला ए. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

सुहास शेट्टीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मंगळूरमध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागात रात्रभर गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मंगळूर शहरात अधिक पोलिस तैनात केले आहेत. हल्लेखोरांनी सुहास शेट्टी याला मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना स्थानिक रहिवाशाने आपल्या मोबाईल फोनवर कैद केली आणि भाजप नेते सुनीलकुमार कारकल्ल (Sunil Kumar Karkal) यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला. शुक्रवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंगळूरचे एडीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) आर हितेंद्र म्हणाले, ‘सुहासच्या हत्येनंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि आम्ही सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.