खडकवासलाच्या पाण्यासाठी इंदापूरकरांचा उद्या रास्तारोको
esakal May 04, 2025 01:45 AM

कळस, ता. ३ : इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर महामार्गावर सोमवारी (ता. ५) रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय लाभधारक शेतकऱ्यांनी घेतला. कळस येथील ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी (ता.३) शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी इंदापूर तालुक्यावर कालव्याच्या पाण्याबाबत होणारा अन्याय प्रत्येकाने चर्चेत मांडला. यावर पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी यांच्याबाबत शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर होता. एकीकडे उन्हामुळे पिके जळून चालली असताना, दुसरीकडे कालव्याच्या आवर्तनाला तारीख पे तारीख मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कालव्याचे पाणी बारामती, दौंडमध्येच अडविले असल्याने आता पाण्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्ग अडविण्याचा निर्णय घेतला आहे.
सभागृहात सकाळी येथील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत, खडकवासला कालव्याच्या पाण्याबाबत चर्चा केली. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी उपलब्धतेचे प्रमाण कमी होते. मात्र आंदोलनानंतर पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी जास्तीचे असतानाही इंदापूरकरांना पाण्यापासून का वंचित ठेवले जात आहे याचा जाब अधिकाऱ्यांना विचारणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.


02983

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.