मुंबईपासून विदर्भापर्यंत महाराष्ट्र एकच असला आणि एकच सीमा असली तरी क्रिकेटमध्ये मात्र हे राज्य मोठे असल्यामुळे क्रिकेटच्या तीन संघटना आहेत. मुंबई शहरपासून पालघर, विरार, कर्जत, कसारा आणि पनवेलपर्यंत मुंबई क्रिकेट संघटना, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी अन्य परिसर महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि तिसरा विदर्भ क्रिकेट संघटना एवढी मोठी व्याप्ती महाराष्ट्र राज्याची आहे.
भारतीय क्रिकेट अर्थात बीसीसीआयशी संलग्न असलेल्या इतर सर्व राज्यांमध्ये महराष्ट्रानंतर गुजरात राज्याच्या अशा प्रकारे तीन संघटना आहेत. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे असलेल्या सर्वांना एकाच संघातून खेळण्याची संधी मिळू शकत नाहीत, त्यासाठी अशा तीन संघटना करण्यात आल्या.
अर्थात मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जाते. विजय हजारे यांच्यापासून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि आताच्या आयुष म्हात्रे या १९ वर्षीय खेळाडूंची नवी पिढी. सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर या महान खेळाडूंचीही पिढी होती.
बृहन्मुंबईबाहेर म्हणजे प्रामुख्याने पुणे आणि परिसरात दि. ब. देवधर यांच्यापासून चंदू बोर्डे आणि आताच्या ऋतुराज गायकवाडपर्यंतच्या खेळाडूंनी महाराष्ट्र क्रिकेटची सेवा केली. मुंबईने तर सर्वाधिक ४२ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले आहे. असा गौरवशाली इतिहास एकीकडे असताना आता देशातील इतर राज्यांतूनही गुणवान आणि लक्षवेधक क्रिकेटपटूंचा ओघ सुरू झाला आहे.
पूर्वी मुंबई, बंगळूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई अशा महानगरांतूनच मोठमोठे खेळाडू तयार होत होते; परंतु रांचीच्या महेंद्रसिंग धोनीने देशातील कानाकोपऱ्यातही गुणवत्ता दडलेली आहे, हे सिद्ध केले.
२००८ पर्यंत अशी गुणवत्ता लहान वयोगटातील आणि पुढे जाऊन रणजी क्रिकेटमधून दिसून येत होती; पण आयपीएल सुरू झाली आणि रणजी क्रिकेट न खेळलेला खेळाडूही डोळे दीपवणारा खेळ करून दाखवू लागला. नुकतेच उदाहरण द्यायचे तर बिहारच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. यंदाच्या आयपीएलमध्ये तर विशीच्या आतचे अनेक नवोदित खेळाडू चमकत आहेत.
देशातील कानाकोपऱ्यात बीसीसीआयचे जाळे पसरले आहे, हे त्यातीलच प्रमुख कारण आहेच; पण सर्वांत महत्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक राज्य आपापली लीग खेळवत आहेत. त्यामुळे अनेक नवोदितांना वेगळा प्लॅटफॉर्म मिळू लागला. आताच्या क्षणी भारतीय संघाचा हुकमी मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती अशाच स्थानिक लीगमधून पुढे आला आहे.
एकीकडे इतर राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या टी-२० लीग सुरू झालेल्या असताना मुंबई, महाराष्ट्र पाठीमागे होते. त्याला प्रमुख कारण होते ते जूनच्या सुरुवातीला सुरू होणारा पाऊस. मुळात आयपीएलनंतर किमान १० दिवस अशा प्रकारची कोणतीही लीग खेळवता येणार नाही, असा बीसीसीआयचा नियम आहे. लोढा समितीच्या शिफारशीनंतर हा नियम तयार करण्यात आला होता.
त्यामुळे पाऊस हे नैसर्गिक कारण होते. आता गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गचित्र बदलल्याचे जाणवत आहे. जूनच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावर पावसाची हजेरी व्हायची; पण आता जूनअखेपर्यंत तरी पाऊस आपले आगमन लांबवतो. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने जूनचा हा कालावधी पकडून गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट लीग सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलले.
यंदा त्यांचे तिसरे वर्ष आहे आणि यंदापासून महिलांसाठीही प्रीमियर लीग होणार आहे. मुंबईत मात्र पावसाचा काही नेम नसतो, त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेने कसाबसा प्रयत्न करून दोन वर्षे सुरू केलेली लीग बंद पडली होती. यंदा तिला पुनरुज्जीवन मिळाले आहे.
त्यात आणखी भर म्हणजे विदर्भ क्रिकेट संघटनेचीही लीग सुरू होत आहे. महाराष्ट्रातील तीन क्रिकेट संघटनांची स्वतःची लीग एकाच वेळी होणार आहे. म्हणजेच मुंबईपासून कोकण-विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच जणांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. असा हा सुवर्णयोग प्रथमच आला आहे.
पूर्वी भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शालेय क्रिकेटपासून सुरू व्हायचा. कॉलेज क्रिकेट ते क्लब क्रिकेटनंतर विविध वयोगटांतून पुढे रणजी क्रिकेटपर्यंत प्रवासाचा हा महामार्ग होता. आता त्यात विविध राज्यांच्या लीग आणि आयपीएलचे व्यासपीठ तयार झाले आहे. मुंबई क्रिकेटच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या अखेरच्या लीगमध्ये शिवम दुबेने भलताच प्रभाव पाडला होता.
त्यानंतर त्याच्या रणजी क्रिकेटसाठी विचार झाला आणि आयपीएल फ्रँचाइझीचेही लक्ष गेले. बघता बघता तो भारतीय संघात आला. अशी राज्या-राज्यांतील लीगमध्ये डोकावले तर अनेक उदाहरणे सापडतील. म्हणूनच महाराष्ट्र राज्य म्हणून तिन्ही संघटनांच्या होणाऱ्या टी-२० लीग अतिशय महत्त्वाच्या आहेत.
याचे आणखी एक कारण म्हणजे नावाजलेले भारतीय खेळाडू किंवा परदेशी खेळाडूंवर अधिकाधिक पैसे मोजण्यापेक्षा राज्या-राज्यांतील लीगवर सर्वच प्रमुख फ्रँचाइझी यांचे बारीक लक्ष असते. येथूनच त्यांना नवी गुणवत्ता शोधता येते. आपापल्या अकादमीत स्थान देऊन अशा खेळाडूंना मुख्य आयपीएलसाठी तयार केले जाते. यात मुंबई इंडियन्स तरबेज आहे.
आताच्याच संघाचे उदाहरण द्यायचे तर अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुतूर ही नावं घेता येतील. यंदाची आयपीएल सुरू होण्यापूर्वी कोणाला हे खेळाडू माहीत होते; परंतु मुंबईसारख्या नावाजलेल्या संघातून खेळायची संधी मिळाली आणि अश्वनी कुमार, विघ्नेश पुतूरसारखे खेळाडू आता राष्ट्रीय निवड समितीच्याही नजरेत आले आहेत.
वैभव सूर्यवंशीने तर आपले नाव अगोदरच अधोरेखित केले आहे. त्याच्या साथीला मुंबईतील आणि चेन्नई संघातून खेळणारा आयुष म्हात्रे आहे. अशा खेळाडूंसाठी मुख्य भारतीय संघातील स्थान अजून फार दूर असेल; परंतु भारतीय संघातून त्यांना परदेशी संघांविरुद्ध खेळण्याची संधी निश्चितच मिळणार आहे.
ही उदाहरणे होती नवोदित खेळाडूंची. सिनियर खेळाडू आणि सध्या भारतीय संघातून दूर फेकला गेलेला शार्दुर ठाकूर आयपीएलमध्ये कोणत्याही संघात नव्हता; परंतु रणजी क्रिकेटमध्ये त्याने चमक दाखवली आणि लखनऊ संघाने त्याला बदली खेळाडू म्हणून संघात घेतले. सुरुवातीच्या सामन्यांत त्याने मॅचविनिंग कामगिरी केली.
आता पुढचा रणजी मोसम सुरू होईपर्यंत तो पुन्हा विस्मृतीत गेला असता; परंतु मुंबई टी-२० लीगमध्ये त्याला आपले सातत्य दाखवण्याची संधी मिळेल. हेच महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडबाबत म्हणता येईल. तो तर चेन्नईसारख्या संघाचा कर्णधार आहे, दुखापतीमुळे तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकला; परंतु तंदुरुस्त ठरला तर महाराष्ट्र क्रिकेट लीग गाजवण्याची संधी त्याच्यासाठी असेल.
पूर्वी मुंबई, बंगळूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई अशा महानगरांतूनच मोठमोठे खेळाडू तयार होत होते; परंतु रांचीच्या महेंद्रसिंग धोनीने देशातील कानाकोपऱ्यातही गुणवत्ता दडलेली आहे, हे सिद्ध केले. २००८ पर्यंत अशी गुणवत्ता लहान वयोगटातील आणि पुढे जाऊन रणजी क्रिकेटमधून दिसून येत होती; पण आयपीएल सुरू झाली आणि रणजी क्रिकेट न खेळलेला खेळाडूही डोळे दीपवणारा खेळ करून दाखवू लागला आहे.