मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची निमंत्रणपत्रिका तडीपार मित्राला द्यायला गेल्याने आणि त्यानेच जुन्या वादातून तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना जेलरोड परिसरात घडली. ही घटना गुरुवारी (दि.१) रात्री मोरे मळा, बालाजीनगर, जेलरोड, नाशिक येथे घडली. विशेष म्हणजे, खूनाच्या घटनेनंतर हल्लेखोर तडीपार गुन्हेगार स्वत:हून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. (A young man from abroad was murdered by his criminal friend)
हितेश डोईफोडे (वय २६, रा. मोरे मळा, बालाजीनगर, जेलरोड, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. निलेश पेखळे असे हल्लेखोराचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हितेश डोईफोडे व निलेश पेखळे हे दोघे मित्र आहेत. निलेश पेखळे याला भेटण्यासाठी हितेश त्याचा मित्र रोहित ऊर्फ बंटी बांग याला घेऊन गुरुवारी (दि.१) रात्री मोरे मळा, बालाजी नगर येथे गेला. मात्र, दोघांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. निलेश याने धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने हितेशच्या डोक्यात वर्मी घाव केला. तर बंटीला मारहाण केली. ही बंटीने त्याच्या भावाला कॉल करून सांगितले. त्यानुसार बंटीला बिटके रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर निलेश जखमी अवस्थेत हितेशला चारचाकी गाडीतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. त्यानंतर हितेशला स्ट्रेचरवर ठेवून निलेशने जिल्हा रुग्णालयातून पळ काढला. त्याने थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
मृत हितेश डोईफोडीची बहीण शितल शैलेंद्र सोनवणे (वय २८) हिने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, आरोपी निलेश हा १४ एप्रिल २०२५ रोजी हितेशच्या घरी गेला होता. त्याने भावजयीची छेड काढली होती. याप्रकरणी १५ एप्रिल रोजी उपनगर पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले होते. मात्र, पोलिसांनी ऑनलाईन तक्रार देण्यास सांगितली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ऑनलाईन तक्रार दिली. तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. हितेशची मुलगी हितांशी हिचा ७ मे २०२५ रोजी पहिला वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे निमंत्रण निलेशला देण्यासाठी गुरुवारी (दि.१) मोरे मळ्यात गेला. गुरुवारी रात्री बिटको रुग्णालयातून रोहित ऊर्फ बंटी बांग याचा कॉल आला. शेजारील मुलाला मारहाण करण्यात आली असून, त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्याची बिटको रुग्णालयात भेट घेतली. त्याने सुमारे सात जणांनी मारहाण केली. तसेच, सुमारे सात जण कोयते घेऊन हितेशच्या मागे पळाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात गेले. रुग्णालयात हितेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून धक्काच बसला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. भावजयीच्या छेडखानी तक्रारीची दखल घेतली असती तर भाऊ आज जिवंत असता. हितेशवर टोळक्याने हल्ला केला आहे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
मृत हितेश डोईफोडे व हल्लेखोर निलेश पेखळे तडीपार होते. जुन्या वादातून निलेशने हितेशचा खून केला. त्यानंतर तो स्वत:हून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
– सचिन बारी, सहायक पोलीस आयुक्त