शिर्डी : तमिळनाडूतील तुरुगात असलेल्या दोन आरोपींना मुक्त करा, अन्यथा तेथील साई मंदिर बॉम्बने उडवून देऊ, अशा आशयाच्या मेल काल साई संस्थानला पाठवीण्यात आला. हा मेल चुकून साई संस्थानकडे आला असावा, असा कयास आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून येथील सुरक्षाव्यवस्था सतर्क करण्यात आली आहे.
काल दुपारी तीन वाजता तमिळनाडूतील साई मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी, या मेलमध्ये देण्यात आली होती. साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साई संस्थानमध्ये तैनात असलेल्या बॉम्बशोधक पथकाने तसेच अहिल्यानगर येथील पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पाठविलेल्या बॉम्बशोधक पथकाने साई मंदिर व परिसराची तपासणी केली. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्गे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी साई मंदिर परिसराची पाहणी केली.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, अजित जॅकुमोली नावाने हा धमकीचा मेल परदेशातून पाठविण्यात आला. आम्ही याबाबतची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना कळवीली. शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. साई संस्थानकडे एक हजार सुरक्षाकर्मचारी असलेली यंत्रणा आहे. ही यंत्रणा सतर्क करण्यात आली. पुरेशी दक्षता घेतली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. भाविकांनी साईदर्शनासाठी शिर्डीत यावे. येथील परिस्थिती सामान्य आहे.