तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात आता बनावट ‘व्हीआयपीं’ना थेट दर्शनबंदीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ‘व्हीआयपी’ पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर प्रशासनाकडून यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींना पास देण्यात येत होते. मात्र काही राजकीय नेत्यांच्या आप्तेष्टांना दररोज पास देण्यात येत असल्याची नागरिकांत चर्चा होती. यासंदर्भात तुळजापुरातील काही राजकीय नेत्यांनी तुळजाभवानी मंदिर समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने बनावट ‘व्हीआयपीं’ना पास न देण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेत उभे राहून इतर भक्तांप्रमाणे ते दर्शन घेऊ शकतात. आमदार, माजी आमदार तसेच सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पास दिले जाणार आहेत.
दोनशे आणि पाचशे रुपयांचे सशुल्क पास दर्शन सुरूच राहणार आहेत.‘व्हीआयपी’ पास व्यतिरिक्त महत्त्वाच्या लोकांना सशुल्क पास दर्शन सेवा उपलब्ध आहे. विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असाही सूर उमटत आहे.
आमदार, माजी आमदार तसेच राज्य सरकारमधील विविध क्षेत्रामधील अधिकारी यांना मंदिर समितीने ‘व्हीआयपी’ दर्जाची सोय कायम ठेवली आहे. तथापि, कोणीही ‘व्हीआयपी’ आहे असे सांगणाऱ्यांना आता थेट दर्शनाची संधी मिळणार नाही.
अरविंद बोळंगे, सरव्यवस्थापक तथा तहसीलदार, तुळजाभवानी मंदिर समिती