- शिल्पा कांबळे, saptrang@esakal.com
सुंदर दिसण्याची नैसर्गिक ऊर्मी आणि सौंदर्याभोवतीच्या बाजारात सापडल्यावर होणारी मनाची अवस्था, या दोन गोष्टी अगदी वेगळ्या प्रतलांवर आहेत. ‘ग्लोबलायझेशन’च्या या अपत्याने सुंदर दिसण्याचे स्वाभाविक ‘लोकल’ उपाय ‘आउटडेटेड’ केले. आपण, आपले, आपल्यापुरते सुंदर दिसण्याचा खटाटोप करताना अनेकदा आजूबाजूच्या जगातली कुरुपता, वास्तवताही जाणवेनाही होते...
सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही... जगातील प्रत्येक मर्त्य माणूस आहे त्याहून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना सौदर्यांचे जास्त भान असते. सस्तन वर्गातील अनेक प्रजातींमध्ये माद्या प्रजननासाठी नरांना आकर्षित करतात. नरदेखील माद्यांचे लक्ष वेधण्यासाठी विविध गोष्टी करतात.
इतर स्त्रियांपेक्षा अधिक सुंदर दिसण्यासाठी स्वतःला सुशोभित करणे ही एक क्लृप्ती आहे. जैविक कारणाने निर्माण झालेली सुंदर दिसण्यामागची प्रेरणा ढोबळमानाने अशी आहे. त्यामुळेच लहान बाळाला दृष्ट लागेल म्हणून जरी आपण काजळ लावले, तरी चेहऱ्याच्या सुंदरतेची पर्वा न करता बाळ ते काजळ पुसून टाकते. लाज झाकण्यासाठी अंगावर घातलेले कपडेही लहान मुले फेकून देतात.
मात्र ‘टीनएज’ फेजमध्ये येताच टेस्ट्रोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या संप्रेरकाचा मारा शरीरात सुरू झाला, की हीच मुलेमुली आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. मुले शरीर सृदुढ करण्यासाठी जिममध्ये जातात, तर मुली फॅशनबल कपडे विकत घेण्यासाठी मॉल गाठतात.
आपण सगळेच कमीअधिक प्रमाणात निसर्गाच्या या चक्रातून गेलो आहोत. पण आज सुंदर दिसण्याचा जो भलामोठा बाजार आपल्या आजूबाजूला भरलाय, तो मात्र या आकर्षणाच्या नैसर्गिक ऊर्मीहून कितीतरी जास्त अक्राविक्राळ आणि भयावह आहे.
जुनी गोष्ट आहे. तेव्हा माझी आजी चापून चोपून नऊवारी साडी नेसायची. कपाळावर मेण लावायची, त्यावर लालभडक कुंकू कोरायची. तिचे केस पांढरेशुभ्र असायचे, त्या केसांना भरपूर तेल लावून ती घट्ट आंबोडा बांधायची. तिच्या अंगावर सोन्याचे मोजकेच, पण भरदार दागिने असायचे. बरे, हे दागिने कुणी परंपरेने आलेले किंवा कुणी करून दिलेले नसायचे!
आजी भाजी विकायची आणि ते पैसे साठवूनच तिने दागिने केलेले असायचे. आपल्या स्वतःच्या कमाईच्या या सोन्याचा तिला भयंकर अभिमान असायचा. हा अभिमानच तिचा देवी आलेला खड्ड्यांचा चेहरा सुंदर करून जायचा.
तर सांगायची गोष्ट अशी, की माझ्या आजीला लहान वयातच देवी आल्या होत्या. देवीचा आजार खरा तर जीवघेणा; पण त्यातही ती वाचली होती. पण फुटकुळ्यांमुळे तिचा चेहरा ओबडधोबड झाला. चेहरा खराब झाला खरा, पण तरीही ती सुंदरच दिसत राहिली.
मी विचार करते, आजच्या काळात असा चेहरा असलेली कोणी बाई असेल आणि तिच्याकडे पैसे असतील तर ती काय करेल?... कॉस्मेटिक सर्जरी करून घेईल? नक्कीच करेल. सुंदर चेहरा, नितळ त्वचा, पांढरेशुभ्र दात, रेशमी केस, यांचे इतके गारूड समाजात झाले आहे, की सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया वाटेल त्या थराला जायला तयार आहेत.
माझ्या ओळखीची एक मध्यमवर्गीय स्त्री आहे, तिने वयाच्या सत्तरीत ‘स्किन टाईटनिंग’ करून घेतले. ‘बोटॉक्स’ झालेल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तिला दिवसरात्र अनेक मलम, लोशन लावावी लागली. तिचे उन्हात जाणे बंद झाले. या ट्रीटमेंटसाठी तिने काही दिवस अक्षरशः स्वतःला घरात कोंडून घेतले.
तिच्या मुलाने तिला खूप दिवसांनी पाहिले, तर तो म्हणाला, ‘‘माझी आई मायकल जॅक्सन झाली! माझी आई मला ओळखताच आली नाही...’’ मी त्या बाईला दोष देत नाही. सुंदर, तरूण दिसण्याचे इतके ‘प्रेशर’ आजूबाजूला आहे, की आत्मसन्मान कमी असलेल्या बायका सुंदर दिसण्याच्या प्रलोभनाला सहज बळी पडतात.
काही दिवसापूर्वी मी एका जवळच्या मैत्रिणीबरोबर पार्लरमध्ये गेले होते. खरेतर दोघी मिळून गप्पा मारू, चहा कॉफी पिऊ, असा मस्त बेत केला होता. पार्लरमध्ये आत शिरल्याबरोबर मला लोकर भादरणाऱ्या मेंढ्याची आठवण झाली. समस्त स्त्री-पुरूष सुंदर होण्यासाठी गर्दी करून त्या मेंढ्याप्रमाणेच एकमेकांशेजारी बसले होते.
सगळ्यांना आहोत त्यापेक्षा अधिक आणि ‘मार्केट’ दाखवत आहे तितके सुंदर दिसायचे होते! सगळीकडे आरसेच आरसे होते. महाभारतातल्या मयसभेच्या मिथकाची आठवण व्हावी असे वातावरण होते. वेळ काढण्यासाठी काहीतरी करणे भाग होते. केस कापावे की स्पा घ्यावा, असा विचार करत असतानाच एक बदामची राणी माझ्याकडे आली.
पार्लरमधल्या त्या मॅनेजर स्त्रीला मी ‘बदामची राणी’ म्हणते, कारण ती नखशिखान्त कृत्रिम सौंदर्याने रंगलेली होती. तिचे केस इराणमधील बायकांसारखे लाल रंगाचे होते. चेहऱ्यावर ऑईलपेंटचा पेस्टल कलर होता. ओठांवर दशावतारात राक्षस लावतो तशी लिपस्टिक होती. माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ ओळखत ती लगेच म्हणाली.
‘स्पा की... केरॅटीन अमका ढमका करा!’ मी सावध होत त्या ट्रीटमेंटची किंमत विचारली. ती म्हणाली- ‘साडेपाच हजार!’ मी नकार दिला. तिने दुसरा पत्ता फेकला. ‘मग ‘बूस्टर’ करा. १५ मिनिटांत होईल. तो कमी किंमतीचा आहे ना, तो भिकार आहे! २० पर्सेन्ट डिस्कांउन्ट देते.’’ बदामची राणी हेअर ड्रेसरला भराभर सूचना देऊन माझ्याकडे न पाहताच निघून गेली.
अर्ध्या तासानंतर आम्हां दोघी मैत्रिणींचे मिळून बिल आले पंधरा हजार! माझे पाच, तिचे दहा. डिस्काउन्ट देऊन दोघींचे ५ हजार होतील, असे मला वाटले होते... पण झाले भलतेच! केसाने गळा कापला, ही म्हण अशी खरी ठरली. पंधरा हजाराचे आमचे हे केशसौंदर्य जेमतेम पंधरा दिवसही टिकले नाही, हे सांगायला नको!
सौंदर्याचा अमानवी बाजार ‘ग्लोबलायझेशन’चे अपत्य आहे. तुम्हाला आठवतंय का, नव्वदच्या दशकात आपल्या देशात एकापाठोपाठ एक मुली विश्वसुंदरी होऊ लागल्या होत्या. सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, युक्ता मुखी... त्याच्या आधीच्या दशकात अशा लागोपाठ भारतीय मुली ‘ब्यूटी क्वीन’ झाल्या नव्हत्या.
‘फॅशन इंड्रस्टी’तील मोठ्या कंपन्या या स्पर्धांच्या प्रायोजक असायच्या. आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याचे करार या जिंकलेल्या मुलींबरोबर एक-एक दोन-दोन वर्षांसाठी केले जायचे. तेव्हाच ‘डिश अँटिना’ही भारतात आला होता. केबलचा वापर करून टीव्हीवर मॉडेल्सचे रँम्प वॉक दाखवले जायचे.
चॅनल्सवर जाहिरातींचा भडिमार सुरू असायचा... क्रीम्स, पावडर, लोशन, हेअर ट्रीटमेंट... हळूहळू हे सगळे घराघरात पसरत गेले. खोबरेल तेल, चंदन, मुलतानी माती, हळद या सुंदर दिसण्याच्या ‘लोकल’ गोष्टी ‘आऊटडेटेड’ झाल्या. ब्यूटी पार्लर्सचा जिकडे तिकडे धंदा सुरू झाला. ज्यांच्याकडे जितके पैसे अधिक, ते तितके अधिक सुंदर दिसू लागले.
मॉडर्न दिसण्यासाठी महागड्या प्रसाधनांना पर्याय राहिला नाही. मुली-स्त्रिया हजारो लाखो रूपये देऊन पार्लरच्या अधीन होऊ लागल्या. मेकअपशिवाय आपला चेहरा आरशात पाहण्याची त्यांच्यात हिंमत उरली नाही. समाजात ज्याप्रमाणे दारू, ड्रग्जची समस्या आहे, त्याप्रमाणे सुंदर दिसण्याची समस्या आहे, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे होणार नाही ना?...
पण असे एकटे एकटे ‘घनघोर’ सुंदर दिसताना आजूबाजूचे कुरूप जग आपल्या डोळ्यांपासून लपू शकते का? भारतातील घाणेरडी रेल्वे स्टेशन्स, बस डेपोमधील अस्वच्छ स्वच्छतागृहे, झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणारे मजूर, कारागीर, प्रदूषित नद्या, तलावातील गाळ, उघड्या गटारांतील डास, चिलटे, बकाल शहरे आणि सोयीसुविधांपासून वंचित असलेली गावेच्या गावे...
हे सगळे इतके कुरूप जग आजूबाजूला असताना आपण आपले, आपल्यापुरते पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसू शकतो का? भारतातील महानगरांना आणि शेकडो गावांना लागलेला कुरूपतेचा हा शाप कधी नष्ट होणार का? (काही जागा या घाणीला अपवाद असतील...) असा आपल्यापुरता एकफुटी आरशासमोर चकाकणारा सौंदर्यांचा अनुभव घेणे, हा कमालीचा स्वार्थ नाही का?... माझा परिसर, आजूबाजूची जागा, आपले शहर, गाव, असे करता करता भारताचा संपूर्ण भूगोल सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे हे या देशाची नागरिक म्हणून माझे कर्तव्य असायला हवे की नको?...
विचार करा... मीही विचार करतेय.