भारतात एसयूव्ही संस्कृती रुजविणाऱ्या वाहनांपैकी एक ‘जीप’ ओळखली जाते. आजघडीला कमांडर, विलिज जीपसारखी वाहने दिसत नसली तरी त्याचीच परंपरा थार, मेरिडियन, गुरखासारखी एसयूव्ही वाहने पुढे नेत आहेत. काही ग्राहकांना जुन्या धाटणीची किंवा विंटेज वाहन चालविण्याची इच्छा असते. अशावेळी कंपन्याही मागणी लक्षात घेता वाहनांत बदल करत त्यास नावीन्यपूर्ण रूप देत आहेत. जुन्या काळातील दणकटपणाचा अनुभव देणारी ही वाहने लक्ष वेधून घेणारी आहेत. म्हणूनच एसयूव्ही जीप खरेदीची उत्सुकता ही अनेकांना जुन्या काळात नेणारी आहे. अशा ‘जीप’ची झलक पहिल्यांदा अमेरिकेत लष्कराच्या ताफ्यात पाहावयास मिळाली. प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. इथे निवडक ऑफ रोड वाहनांची माहिती देता येईल. याशिवायही आणखीही काही वाहने बाजारात उपलब्ध आहेत.
महिंद्रा थारभारतातील ऑफ-रोड एसयूव्ही म्हणून महिंद्र थारने नावलौकिक मिळवला आहे. मजबूत चासी, फोर बाय फोर ड्राइव्ह आणि दमदार इंजिन ही थारचे वैशिष्ट्ये.
खराब रस्त्यांवर चालण्यासाठी उत्तम, मजबूत
बांधणी आणि चांगला ग्राउंड क्लिअरन्स, अशी त्याची बलस्थानं. साधारणपणे दोन इंजिनच्या पर्यायात उपलब्ध असणारी थार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक श्रेणीत उपलब्ध आहे. वॉटर वाडिंग क्षमता सुमारे ६५० मिमी आहे.
ग्राउंड क्लिअरन्स २२६ मिलीमीटर असून लो-रेंज गिअरबॉक्स, ईएसीपी हिल डिसेंट कंट्रोलची सुविधा आहे.
प्रीमियम सेगमेंटमधील ऑफ रोड वाहन म्हणून जीप मेरिडियन लोकप्रिय आहे. फोर बाय फोर क्षमता असण्याबरोबरच यात लक्झरी फीचर्स आहेत. सात आसनी एसयूव्ही ओबडधोबड रस्त्यावरही प्रवाशांना आरामदायी ठरते. फॅमिली ड्रायव्हिंग आणि ऑफ रोडिंगच्या अनुभवासाठी उत्तम अाहे. २.० लिटर चार सिलिंडर डिझेल इंजिन ही १७० बीएचपी ऊर्जा आणि ३५० एनएमचा टॉर्क जनरेट करते.
हे वाहन नऊ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे. सहा स्पीड गिअरबॉक्समध्ये देखील मेरिडियन उपलब्ध आहे. वॉटर वाडिंग क्षमता ५०० मिमी असून ती १३ ते १५ किलोमीटर मायलेज देते. पॅनोराॅमिक सनरूफसह असणाऱ्या मेरिडियनमध्ये सहा एअरबॅग आहेत.
अत्यंत खडकाळ आणि कठीण रस्त्यांवरही सहज चालणारे वाहन म्हणजे फोर्स गुरखा. गुरखा वाहनात प्रामुख्याने डिझाइन आणि क्षमतेवर भर देण्यात आला आहे. गुरखा ऑफ रोडिंगसाठी एक परिपूर्ण पर्याय म्हणून ओळखला जातो.
लष्करी वाहनांप्रमाणे ती दणकट आहे. २.६ लिटर डिझेलचे इंजिन ९१ बीएचपी ऊर्जा निर्माण करते. गुरखा वाहनाचा ग्राउंड क्लिरअन्स २१० मिमी आहे. यात स्नॉर्केल आणि ‘लो रेंज ट्रान्स्फर’ सुविधाही आहे.
भारतातील एसयूव्ही चाहत्यांसाठी एक आकर्षक वाहन म्हणून फॉर्च्यूनरकडे पाहिले जाते. दमदार फोर बाय फोर सिस्टीम आणि विश्वासार्हतेमुळे या वाहनास मागणी असते. लक्झरी आणि पॉवर याचा सुंदर मिलाफ आहे.
यात दोन इंजिन पर्याय असून, त्यात २.७ लिटर पेट्रोल (१६६ बीएचपी) आणि २.८ लिटर डिझेल (२०४ बीएचपी) यांचा समावेश आहे. ग्राउंड क्लिअरन्स २२५ मिमी आहे. फॉर्च्यूनरमध्ये अॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि डाऊनहिल असिस्ट आहे. मायलेज साधारणपणे बारा ते पंधरा किलोमीटर प्रती लिटर मिळतो.
‘टाटा’ समूहाच्या वाहनांनी नेहमीच ग्राहकांची मने जिंकली आहेत. ‘फोर बाय फोर’सह टाटा सफारीचे नवे मॉडेल ऑफ-रोडिंगसाठी वापरलं जातं. अर्थात सफारीने आपल्या मजबूत साच्यासह खराब रस्त्यांवर दमदार कामगिरी केली आहे.
सात आसनी एसयूव्ही २००५ मध्ये लॉन्च केली होती. या वाहनात वेळोवेळी बदल करण्यात आले. यात २.० लिटर क्रायोटेक डिझेल इंजिन असून ती सहा स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकमध्ये पाहवयास मिळते. ग्राउंड क्लिअरन्स २०५ असून वॉटर वाडिंग क्षमता तब्बल ५०० मिमी आहे.
१९८०-९०च्या दशकात हुकूमत गाजविणारी महिंद्राची कमांडर जीप अनेकांना आठवत असेल. ग्रामीण भागातील खाचखळगे पार करणारी गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली असायची. तत्कालीन काळात जीप शैलीतील गाड्या विशेष लोकप्रिय ठरल्या. यात विलीज जीप, प्रीमियर जीप, क्रुझर याचाही उल्लेख करता येईल. ही वाहने ग्रामीण भागातील प्रवाशांची पहिली पसंती होती. आज एसयूव्ही आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त वाहनांतून प्रवास होत असला तरी ताडपत्र्याचे दरवाजे आणि आच्छादन असलेल्या जीपला तोड नव्हती. ती एसयूव्हीची बाल्यावस्था होती.
सुझुकी जिम्नीहलक्या वजनाची सुझुकी जिम्नीत ऑफ-रोडची क्षमता आहे. कॉम्पॅक्ट साइज जिम्नी ही सस्पेन्शन, ग्राउंड क्लीअरन्स आणि लो-रेशियो गिअरिंगमुळे चिखल, वाळू, डोंगर किंवा खराब रस्त्यावरही सहजपणे चालू शकते.
यात दोन गिअरबॉक्सचा पर्याय असून ग्राउंड क्लिअरन्स हा २१० मिमी आहे. यात सहा एअरबॅग्ज, हिल डिसेंट कंटेल आणि हिल होल्ड असिस्टची सुविधा आहे. रिव्हर्स पार्किंग कॅमेराही आहे. छोट्या आकारामुळे ती अरुंद रस्त्यावर आणि जंगलात सहजपणे फिरू शकते. जिम्नीची वॉटर वाडिंग क्षमता सुमारे ३०० ते ३५० मिमी आहे.
‘ऑफ रोड’ वाहनांची खासियतईएसपी : इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम म्हणजेच ईसीपीमुळे गाडी निसरड्या रस्त्यांवरून घसरत नाही. गाडी घसरण्याची शक्यता असते तेव्हा ईएसपी तंत्र आपोआप ब्रेक्स आणि इंजिन पॉवरवर नियंत्रण ठेवते आणि ती स्थिर ठेवण्यास मदत करते.
एचडीसी : डोंगरावरून गाडी उतरत असताना गाडीचा वेग वाढण्याची शक्यता असते. अशावेळी एचडीसी (हिल डिसेंट कंट्रोल) सक्रिय झाल्याने गाडी स्वत:हून थांबते आणि समान वेगाने खाली उतरते. अशावेळी चालकाला केवळ स्टिअरिंग सांभाळावे लागते, ब्रेक लावायची गरज भासत नाही.
अॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल : ही एकप्रकारची सुरक्षा असून ते उपयुक्त तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. आॅफ रोडवर काहीवेळा टायर घसरतात किंवा अधांतरी राहतात. अशावेळी टायरची जमिनीवरची पकड सैल होते. तेव्हा अॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोलला टायर घसरत असल्याचे संकेत मिळतात आणि ही यंत्रणा वेग कमी करते आणि ज्या चारपैकी कोणत्या टायरची जमिनीवरची पकड अधिक आहे, त्यास अधिक ऊर्जा देते आणि गाडीला समान रेषेत पुढे नेले जाते. खड्ड्यात जर मागचे टायर अडकले असेल तर त्या टायरला अधिक वेग मिळतो आणि वाहन बाहेर येण्यास मदत मिळते.
स्नॉर्केल : स्नॉर्केलला गाडीचे नाक समजा. ती गाडीला श्वास घेण्यास मदत करते. हे एक लांब नळीच्या आकाराचे उपकरण असतं, जे वाहनाच्या एअर इनटेक सिस्टिमला उंचीवर नेत हवा खेचते. पाण्यातून जात असतानाही स्नॉर्केलमुळे इंजिनला कोरडी हवा मिळते आणि ती बंद पडत नाही. रिव्हर क्रॉसिंग, वाळवंटी भागात ही यंत्रणा उपयुक्त ठरते.
लोरेंज ट्रान्स्फर : गाडीला प्रचंड वेग देणाऱ्या क्षमतेला लो रेंज ट्रान्स्फर केस असे म्हटले जाते. तुम्ही एखाद्या खडकाळ, दलदलीतून, वाळवंटातून गाडी चालवता तेव्हा गाडीला अधिक वेग हवा असतो. लो रेंज मोडमध्येही गाडीचा गिअर कमी राहतो; परंतु इंजिनची शक्ती वाढते. अशावेळी कमी वेगातही गाडी सुरळीत चालते आणि एरवी ती सामान्य गिअरमध्ये जाणे शक्य नाही. उंच भागात जात असताना लो रेंज सिस्टीम सुरू केल्यास गाडी आरामात वर जाते.
वॉटर वाडिंग : वॉटर वाडिंग म्हणजे वाहनाची पाण्यातून वाट काढण्याची क्षमता होय. एखाद्या वाहनाची वॉटर वाडिंग क्षमता ३०० मिमी असेल तर ते वाहन तेवढ्या खोलीवरच्या पाण्यातून सहजपणे किनाऱ्यावर जाऊ शकते. पाणी मर्यादेपेक्षा अधिक असेल तर इंजिनमध्ये पाणी शिरू शकते. अशावेळी स्नॉर्केल महत्त्वाची भूमिका बजावते