- इर्शाद बागवान, saptrang@esakal.com
बागवानी लोक व्यापारासाठी देश-परदेशांतील विविध भागांत वावरले. तिथल्या भाषेतील रूढ आणि वैशिष्ट्यपूर्ण शब्द आत्मसात करून त्यांनी आपल्या बोलीत प्रेमाने गुंफले. परंतु आपल्या मराठी भाषेचाच सर्वांत जास्त प्रभाव बागवानी बोलीवर पडला. मराठीतील कित्येक शब्द जसेच्या तसे बागवानीत वापरतात आणि ते बेमालूम मिसळून जातात.
‘दखनी’ बोलीभाषा आणि ‘बागवानी’ बोलीभाषा यांत खूपच साम्य आहे. किंबहुना बागवानी बोली ही दखनीची पोटभाषा म्हणता येईल. महाराष्ट्रात बागवान लोकांत आपसांत बोलली जाणारी, तसेच त्यांच्या घरात बोलली जाणारी ही बोली ऐकणाऱ्याला आनंद देणारी, तसेच कानी पडताच चेहऱ्यावर हास्याची सूक्ष्म लकेर आणणारी आहे.
आजही महाराष्ट्रातील लाखो बागवान खेडोपाडी, तालुक्याच्या गावी वसलेले आहेत; त्यांच्या तोंडी हीच भाषा वसते. बागवान लोकसमूह मुसलमानांमधला एक मोठा लोकसमूह आहे. त्यांच्या घराघरांत ही भाषा अजून जिवंत आहे.
या बोलीच्या इतिहासाबद्दल मला जास्त बोलता येणार नाही. परंतु ही बोली मी स्वतः लहानपणापासून ऐकत-बोलत आलेलो आहे. जशी दखनी भाषा उत्तर भारतीय खडी बोली, मराठी, तेलुगू, कानडी, फारसी आणि अरबी या भाषांच्या मिलाफातून तयार झाली, तशीच बागवानी बोलीही.
बागवानी बोलीच्या उदाहरणादाखल समाजमाध्यमांवरील माझ्या या एका पोस्टचा तुकडा पहा-
‘वत्तेमें एकजनां आया. कुटर बंद करलेते थांब्या. कुटर स्ट्यान्डपे लगाया अन् खिशेमें हात दालके खिसा चापसलेते फलांपरशे चौफेर नजर फिराया. फिर हाल्लुच समजिंगी नै समजिंगी ऐशी उप्परके खिशेमें फूंक मारलेते खिशेके तलतक नजर डुबाते बोल्नेके वास्ते मुंमेंकेमूंमें शब्दां जुळाया...’
एक प्रसंग यात उभा केलाय बघा- खिसा, चापसूनच- चापसलेते, चौफेर, शब्दां, जुळवले- जुळाया! इतक्या सहजपणे मराठी शब्द बागवानी बोलीत मिसळून गेलेले आहेत. तसेच ‘समजिंगी नै समजिंगी’- ‘समजेल न समजेल’ हे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ही रंजक आहे.
बागवान म्हणजे माळी. पूर्वीच्या काळी शेती सांभाळणारी, बागेची काळजी घेणारी, फळे-भाज्या पिकवणारी आणि विकणारी ही मुसलमानांतील एक पोटजात. काळाच्या ओघात शेतकऱ्यांकडून बागेतील झाडांचे आणि त्या अनुषंगाने फळांचे सौदे करुन, ते घाऊकपणे विकत घेऊन, फळांची तोड करुन, ती पिकवून बाजारात लिलावाने विकणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला.
या व्यवहारासाठी देशातील/ परदेशातील वेगवेगळ्या प्रांतात ये-जा वाढली. तिथल्या स्थानिक लोकांशी, शेतकऱ्यांशी संबंध येऊ लागले. त्या त्या भागांतील भाषांमधले वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखे शब्द कानांवर पडू लागले. देशाबाहेर पश्चिम आशियात, तर भारतात जम्मू, कर्नाटक, आंध्र, केरळ, इ. बऱ्याच प्रदेशांत जाणेयेणे वाढल्यामुळे बोलीत अधिकच्या शब्दांची बेमालूम भर पडू लागली. त्यातून ही बागवानी बोलीभाषा तयार झाली.
व्यापारात काही इतरांना न कळणारे, फक्त आपल्या जोडीदारालाच कळतील असे शब्द उदयाला आले. उदा. ‘गाद हेटा मंदी’- ‘अत्यंत वाईट मनुष्य’, ‘सुत्रा’- ‘चांगला’, ‘बुत सला’- ‘वीस रुपये’. अशी व्यापारी ‘कोड लँग्वेज’ही बागवान लोक बागवानीशी जोडून वापरतात.
व्यापाराशिवाय घरांत बागवानी बोलीच बोलली जाते. विशेषतः खेडोपाडी, तालुक्याच्या ठिकाणी. शहरात राहणारे बागवानही आपसांत ही भाषा बोलतात. नाही म्हणता ‘मेट्रो सिटी’मध्ये राहणारे बागवान आताशा चारचौघांत बागवानी बोलताना लाजत असले, तरी त्यांची संख्या खूप कमी आहे.
इतर मुस्लीम समाजातही बागवानी प्रिय आहे. काही शब्दांची अदलाबदली फकस्त! आता हा ‘फकस्त’ शब्द ‘फक्त’ या शब्दाऐवजी मी वापरला, अगदी तसेच. दखनी, बागवानी या तऱ्हेने एकूणच मुस्लीम गोतावळ्यात ठाण मांडून आहे.
‘चंगिरीमें रूटी हय क्या नै? मेरा छोरा आये देक कामपरशे दमभागके,’ अशी प्रेमळ विचारपूस करणारी आई, ‘जुलवा लगनेकी उमर हुय तुबी न्हन्ने छोरेसारका लाडमें क्या आतेस?,’ म्हणणारी मोठी बहीण, ‘अय गाबड्यांनो, इस्के आग्गे आंगनमें बॉल आयातो देक, तंगडीच तोडके हातमें देतीव.
मूंगमुसंडे, चैनशे जगने देनाले नै,’ म्हणत गल्लीतल्या पोरांना डाफरणारी माऊली, ‘अब्बू अब्बू, चाँदमामू सुबुकू किदर जातां?,’ असं बापाला विचारणारी चिमुकली- हे सगळं इथलंच आहे, आपल्या मातीतलं. काही शब्द इकडूनतिकडून आलेत. बाकी सारं मराठीतलंच आहे.
लाडक्या मुलाच्या लग्नाआधी हळदी समारंभात जमलेल्या बायकांत आजही आई हे गाणे गाते,
‘आज दुल्हे बने माँ के लाल रे
आज दुल्हे बने माँ के लाल रे...’
आपल्या महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा जशी दखनीवर प्रभाव टाकते, तसाच प्रभाव मराठीचा बागवानीवर आहे. असं म्हणतात, की दर बारा कोसांवर भाषा बदलते. या नियमाप्रमाणे बागवानीही सातारा, सांगली, कोल्हापूर करत आपापल्या भागातील मराठी ‘टोन’प्रमाणे थोडी थोडी बदललेली जाणवते. तसेच प्रत्येक भागातील आपले आपले काही ‘सिग्नेचर मार्क’ भाषेत उठून दिसतात.
उदा.- सातारकर म्हणेल, ‘आच्चे मार्का पाड्यास तो रे. आबी आग्गे क्या करनेकां ठरायलायस?’ तर कऱ्हाडकर हेच वाक्य असे म्हणेल, ‘चकोट मार्का पाड्यास तो रे...’ कोल्हापूरकर एकमेकांना भेटल्यावर बोलतील, ‘फिर क्या क्या? भला चले नै?’ ‘क्या क्या?’ ही द्विरुक्ती खास कोल्हापूरची आहे. अशा रितीने आपापल्या भागातील खास ढब, लहेजा, तसेच वैशिष्ट्यपूर्ण शब्द लेऊन बागवानी सजत जाते, समृद्ध होत जाते.
आमच्या सांगलीकडच्या काकूंच्या बोलण्यात बरेच वाक्प्रचार येतात. कसे ते बघा- एखादं मूल त्याला सांगितलेलं काम खूपच रेंगाळत करत असेल तर त्या म्हणतील, ‘आवर चटाचटा, मग्रीब हुई देक!’ म्हणजे ‘तिन्हीसांज झाली, तरी तू इथेच?’ आणि हे वाक्य त्या अगदी पहाटेसुद्धा बोलतील!
तसेच, ‘काम का ना काज का दुश्मन अनाज का,’ हे रिकामटेकड्याला उद्देशून बोलताना हमखास वापरलं जाणारं वाक्य. ‘मान न मान तू मेरा म्हैमान,’ हे जबरदस्ती अंगावर पडणाऱ्याला उद्देशून बोललं जातं. किंवा- ‘किस्काक्यातोकिस्काक्या!’- हे मुद्दामच जोडून लिहिलं, कारण ते तसंच बोललं जातं! खरंतर हे आपल्या मराठीतील, ‘कुणाचं काय, तर कुणाचं काय!’ याचं बोली रूप. जसंच्या तसं उचलून या बोलीत वापरलेलं.
बागवानी बोलीतील अजून काही किश्श्यांचा आस्वाद घेऊ, पुढील भागात.
(क्रमश:)