न्यूयॉर्क : जगातील पाचवे श्रीमंत व्यक्त आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवे ब्रेक्झ.एन कंपनीच्या सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. वयाच्या 94 व्या वर्षी वॉरेन बफे यांनी कंपनीची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की आता वेळ आलीय की ते या वर्षाच्या अखेरीस या पदावरुन निवृत्त होतील.
वॉरेन बफे यांनी सीईओ पदावरुन पाय उतार होण्याची घोषणा ओमाहामध्ये बर्कशायरच्या वार्षिक बैठकीत केली. ते म्हणाले की, मला वाटतंय की कंपनीला नवा मुख्य कार्यकारी अधिकारी मिळायला हवा, आता वेळ आलीय की या वर्षाच्या अखेरीस या पदावरुन निवृत्त होईल.म्हणजेच वॉरेन बफे 2025 च्या शेवटी बर्कशायर हॅथवे सोडतील. वॉरेन बफे यांनी अचानक घोषणा करुन 40 हजार शेअरधारकांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, गुंतवणूकदारांनी बफे यांच्या निर्णयाचं उभं राहून टाळ्या वाजवत स्वागत केलं.
वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवे मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, त्याचवेळी त्यांनी उत्तराधिकारी कोण असेल याचा सस्पेन्स देखील संपवला आहे. 2025 च्या अखेरीस ग्रेग एबेल यानं जबाबदारी स्वीकारायला हवी, असं ते म्हणाले. ग्रेग एबेल सध्या या कंपनीत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. वॉरेन बफेनंतर ते सीईओ होतील. ग्रेग एबेल यांचं वय 62 वर्ष असून ते 2018 पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष असून नॉन विमा व्यवसायाचं नेतृत्व करत आहेत. 2021 पासूनच वॉरेन बफे यांनी उत्तराधिकारी म्हणून ग्रेग एबेल यांना नामांकन दिलं होतं.
बर्कशायर हॅथवेचं बाजारमूल्य 1.16 ट्रिलियन डॉलर आहे. वॉरेन बफे यांनी बर्कशायरमध्ये शेअरधारक राहणार असल्याचं सांगितलं. सर्व निर्णय ग्रेग एबेल घेणार असले तरी त्याला सल्लागार म्हणून काम करणार असल्याच वॉरेन बफेंनी म्हटलं. वॉरेन बफे यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेअरची विक्री करणार नाही तर ते शेवटी दान करणार असल्याचं सांगितलं.
वॉरेन बफे यांनी वयाच्या 94 व्या वर्षी निवृत्ती घेणं हे एका युगाचा शेवट मानला जात आहे. त्यांनी जवळपास 60 वर्षाच्या कार्यकाळानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या नेतृ्त्त्वात बर्कशायर हॅथवे एका अयशस्वी कापड कंपनीपासून 1.16 ट्रिलियन डॉलर्सच्या ग्रुपमध्ये बदलली असून त्याचा विस्तार संपूर्ण अमेरिकेत आहे.
दरम्यान, शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार विषयक धोरणांवर टीका देखील केली. जागतिक व्यापार सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला.