Kashedi Ghat Tunnel Open Date : कोकणात सुट्ट्यांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा १५ मे रोजी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कशेडी घाटातील बोगदा सुरू झाल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की, 'पोलादपूर बाजूचा वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी बाजूचा पुरवठा पुढील १५ दिवसांत सुरू होईल.'
हा मुंबई-गोवा मार्गाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या बोगद्यातील अंतिम कामे वेगाने सुरू आहेत. बोगद्यातील गळतीसाठी ग्राउंटिंग आणि पथदीप, वीज खांब यांचे काम लवकरच पूर्ण होईल. २ किमी लांब असलेला हा बोगदा आणि ९ किमीचा मार्ग पोलादपूर ते खेड तालुक्यातील कशेडीपर्यंत आहे. यामुळे ४०-४५ मिनिटांचा घाटाचा वळसा आता १०-१५ मिनिटांत पार होईल. बोगद्यात वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. २४ तास वीजपुरवठा आणि सुसज्ज सुविधांमुळे सण-उत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मे-जून महिन्यातील गर्दीच्या काळात हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे.
महामार्गाचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ४७१ किमी लांब या प्रकल्पापैकी सुमारे ६७% काम पूर्ण झाले आहे. कशेडी घाटातील दोन बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील दोन आठवड्यात हा बोगदा पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान हे बोगदे तात्पुरते खुले केले गेले होते, परंतु गळती आणि वीज समस्यांमुळे पुन्हा बंद करण्यात आले.