Shinjini Mukherjee vs Pune Flame University : पुण्यातील फ्लेम विद्यापीठाला मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. माजी सहायक प्राध्यापक शिंजिनी मुखर्जी यांना बडतर्फ करण्यात आलेल्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने फ्लेम विद्यापीठाला प्रतिशपथपत्र (affidavit) दाखल करत उत्तर मागवले आहे. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक शिंजिनी मुखर्जी यांना पुणे फ्लेम विद्यापीठाने डिसेंबर २०२४ मध्ये बडतर्फ केले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०२५ मध्ये मुखर्जी यांनी फ्लेम विद्यापीठाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ७ मे पर्यंत फ्लेम विद्यापीठाला affidavit नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कुत्र्यांना खायला घालण्यावरून प्राध्यापक शिंजिनी मुखर्जी आणि पुणे फ्लेम विद्यापीठातील प्राणी कल्याण समिती (AWC) यांच्यामध्ये वाद झाला होता. या प्रकरणात पुण्यातील फ्लेम विद्यापीठाने शिंजिनी मुखर्जी यांना २१ डिसेंबर २०२४ रोजी बडतर्फ केले होते,त्याबाबत पत्रक त्यांना दिले होते. या निर्णायाविरोधात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मुखर्जी यांनी ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांच्या मार्फत कोर्टात याचिका दाखल केली होती. याची नुकतीच सुनावणी झाली. युक्तीवादानंतर कोर्टाने फ्लेम विद्यापीठाला affidavit नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकेत युक्तीवाद काय?कायमस्वरूपी चौकशी केल्याशिवाय बडतर्फ करता येत नाही. कुत्र्यांना खायला घालणे, यासारख्या प्राणी कल्याणाच्या कार्यासाठी बडतर्फी करायचं असल्यास, पुराव्यासह क्रॉस-एक्झामिनेशन आवश्यक आहे. युनिव्हर्सिटीने नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत आहे.
पुढील सुनावणी कधी होणार?मुखर्जी यांच्या वकिलांपैकी एक झुमा सेन यांनी सांगितले की, फ्लेम विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या प्रकरणातील सुनवाणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये झाली. विद्यापीठाला कोर्टाने सात मे पर्यंत प्रतिशपथपत्र दाखल करण्याचे सांगितले आहे. याचिकाकर्त्यांना १३ जूनपर्यंत प्रत्युत्तर दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २३ जून २०२५ रोजी होणार आहे.