आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्याआधी बांगलादेशने टी 20 संघाच्या कर्णधारपदी विकेटकीपर बॅट्समन लिटन दास याची नियुक्ती केली आहे. लिटन पाकिस्तान विरुद्ध मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या टी 20i मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ऑफ स्पिनर मेहदी हसन याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. लिटन दास याने याआधीही बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे. ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्या राजीनाम्यानंतर लिटन दास याला कर्णधार करण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र नजमूल हुसैन शांतो याची कर्णधारपदी निवड करण्यात आली. शांतोने जानेवारी 2025 मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता लिटनला कॅप्टन्सी देण्यात आली आहे.
लिटनने आतापर्यंत बांगलादेशचं 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 4 टी 20i सामन्यांमध्ये बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र लिटनला पू्र्ण वेळ कर्णधारपद मिळण्याची पहिली वेळ ठरली आहे. लिटनने डिसेंबर 2024 मध्ये विंडीज विरुद्ध नेतृत्व केलं होतं. बांगलेदेशने त्या मालिकेत 3-0 अशा फरकाने विजय मिळवला होता.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कर्णधाराच्या नियुक्तीसह यूएई आणि पाकिस्तान विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. नजमुल शांतोसह एकूण 5 खेळाडूंचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. या खेळाडूंमध्ये तॉहिद हृदॉय, तनवीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि शोरिफूल इस्लाम यांचा समावेश आहे. तर अफीक हुसैन, मेहदी हसन मिराज, रिपोन मंडल आणि तास्किन अहमद यांना डच्चू देण्यात आला आहे.
बांगलादेश या दोन्ही टी 20i मालिकांसाठी यूएई आणि पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेश विरुद्ध यूएई यांच्यात शारजाहमध्ये 17 आणि 19 मे रोजी टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर बांगलादेश पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 25 मे ते 3 जून दरम्यान 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेशचा टी 20I संघ जाहीर
यूएई आणि पाकिस्तान विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी बांगलादेश टीम : लिटन दास (कर्णधार), तांझीद तमीम, मेहदी हसन मिराज (उपकर्णधार), परवेज हुसैन एमोन, सौम्या सरकार, नजमुल हुसैन शांतो, तॉहीद हृदोय, शमीम हुसैन, जाकेर अली, रिशाद हुसैन, तनवीर इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा आणि शोरफुल इस्लाम.