Digital Healthcare : ई-हॉस्पिटल प्रणाली पुन्हा सुरू होणार! एका क्लिकवर मिळणार रुग्णांचे अहवाल; ३२ कोटींचा निधी मंजूर
esakal May 05, 2025 08:45 AM

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांत पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे. मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसला होता. आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘एचएमआयएस’ ही डिजिटायझेशन प्रणाली गेल्या २२ महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णांची नोंदणी, तपासण्या आणि उपचाराची माहिती एका क्लिकवर मिळण्यात अडचण येत होती. ती आता सुरू करण्यावर भर दिला जात आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयासह राज्यातील ५२ वैद्यकीय संस्थांमध्ये २००८ पासून ही ऑनलाईन प्रणाली कार्यरत होती. मात्र ५ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री ही सेवा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला गेला. त्यानंतर सर्व कामकाज पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. यामुळे रुग्णांना रक्त चाचणी, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यासारख्या सेवा मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. आता या प्रणालीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने ३२.२१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. डॉक्टर आणि रुग्णांसाठी ही प्रणाली अत्यंत आवश्यक आहे. या प्रणालीमुळे एका क्लिकवर डॉक्टरांना रुग्णांचा पूर्व तपासणीचा अहवाल उपलब्ध होईल.केसपेपर काढण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.

ऑनलाईन सेवा पुन्हा सुरू होणार

वैद्यकीय शिक्षण विभागाने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात एचएमआयएससह ११ पैकी ९ बाबी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. दोन बाबींवर कार्यवाही सुरू आहे. रुग्णालयांमधील ऑफलाईन प्रक्रिया बंद होऊन ऑनलाईन सेवा पुन्हा कार्यान्वित होऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.