IPL 2025: LSG साठी प्लेऑफची दारं अजूनही बंद झालेली नाहीत! कर्णधार रिषभ पंत म्हणतोय, 'आम्ही जर...'
esakal May 05, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (४ मे) लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्सविरुद्ध ३७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचा हा ११ सामन्यांमधील ६ वा पराभव आहे. त्यामुळे लखनौ सध्या ५ विजयांसह १० गुणासह सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

लखनौचे आव्हान अद्याप जिवंत असले, तरी त्यांचे आता तीन सामने बाकी आहेत. त्यामुळे लखनौला आता फक्त १६ पाँइंट्सपर्यंतच पोहचता येणार आहे. त्यामुळे त्यांना आता प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. याबाबत पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर लखनौचा कर्णधार प्रतिक्रिया दिली आहे.

धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौसमोर विजयासाठी २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला २० षटकात ७ बाद १९९ धावाच करता आल्या.

या सामन्यानंतर रिषभ पंत म्हणाला, 'नक्कीच खूप जास्त धावा होत्या. जेव्हा तुम्ही चुकीच्यावेळी महत्त्वाचे झेल सोडता, तेव्हा त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. आम्ही सुरुवातीला योग्य लेन्थ पकडू शकलो नाही. पण हा खेळाचाच एक भाग आहे.'

लखनौच्या प्लेऑफमधील आशांबाबत रिषभ पंत म्हणाला, 'स्वप्न अजूनही कायम आहे. जर आम्ही पुढचे तिन्ही सामने जिंकले, तर नक्कीच आम्ही परिस्थिती बदलू शकतो. '

रिषभ पुढे म्हणाला, 'तुमची वरची फळी जेव्हा खूप चांगली फलंदाजी करत असते, तेव्हा फायदा असतो. पण प्रत्येक सामन्यात ते चांगलेच खेळतील, अशी आशा तुम्ही करू शकत नाहीत. हा खेळाचा एक भाग आहे. आम्हाला सामना खोलपर्यंत नेण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी ते सर्वाज जास्त जबाबदारी घेऊ शकत नाहीत. जसं तुम्ही म्हणाला, पाठलाग करण्यासाठी खूप धावा होत्या, आम्हाला तेच महागात पडले.'

या सामन्यात पहिल्या तीन विकेट्स ५ षटकांच्या आतच गमावल्या होत्या. रिषभ पंतही १८ धावांवर बाद झाला. नंतर आयुष बडोनीने ४० चेंडूत ७४ धावांची आणि अब्दुल सामदने २४ चेंडूत ४५ धावांची खेळी करत डाव सावरला होता. पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतल्या.

त्याआधी लखनौने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले होते. पंजाबने २० षटकात ५ बाद २३६ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने ४८ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. शशांक सिंगने १५ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या, तर जोश इंग्लिसने ३० धावांची खेळी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.