ढिंग टांग
झुंजुमुंजु होऊन बराच वाढुळ वेळ झालावता. (कृषिकथा असल्याने बॅकग्राऊंड ग्रामीण ठेवावी लागणार. तस्मात ही सुरवात. शहरी अडाण्यांसाठी शब्दार्थ : झुंजुमुंजु-पहाट, बराच– बराच. वाढुळ -बराच. झालावता- झाला होता.) महाबळेश्चरच्या निसर्गरम्य खोऱ्यातील दरे नावाच्या येका सुंदरशा गावानजीकचा माळ उन्हानं तापत व्हता. (राहू दे व्हताच.) माळ तापला तरी हिरवाईची झिलई त्यानं आजुनसुदिक सोडली नव्हती. (नव्हतीच ठीक!) दोन कास्तकार शिवारात बांधाबांधानं हिंडत व्हते. येक्यानं खांद्यावं (शहरी अडाण्यासाठी : खांद्यावं म्हंजी खांद्यावर.) लांबसडक पांढरीची काठी आडवी धरली व्हती. दुज्याच्या खांद्यावं कुदळ व्हती. दोघं बी बांधाबांधानं हिंडत व्हते.
दुनिव्येसाठी ते कास्तकार नव्हते. एक जगविख्यात नटसम्राट विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर होते, आणि दुसरे तितकेच जगविख्यात ‘उठाव’दार माजी सीएम एकनाथ ऊर्फ कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) होते. दोघं बी जुने दोस्त. दोघं बी मनानं शेतकरी. आन कामाला शहरगावात. लई दिसांनी दोघं भ्येटले. सुकदुखाचा गप्पा झाल्या. कोन भ्येटलं, कोन ख्येटलं, दुक्काळाची चिन्नं असं कायबाय बोलनं झालं…
‘‘काय म्हनता इस्वनाथा! येरवाळीच आलाईस जनूऽऽ,’’ कुदळवाल्या कास्तकारानं ऊर्फ कर्मवीरांनी ख्यालीखुशालीचं इच्यारलं. इथं ॲक्सेंट साफ चुकला, हे त्याच्याच ध्यानात आलं, पण दोघांनी बी दुर्लक्ष केलं…सॉरी, क्येलं!!
‘‘इस्वनाथा काय म्हंतुयास! आवघं जग मला नाना म्हनून हाळ्या घालतंय की रं!,’’ काठीनं पिरमानं ढोसकून पहिला कास्तकार ऊर्फ नाना सलगीनं म्हनाले.
‘‘मी बी येकनाथच हाय, पन ७२ देशात माझं नाव लाडका भाऊ म्हनून गाजतंया!,’’ कर्मवीर भाईसाहेब म्हणाले. ‘मी आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो, आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन झालोय’ हे वाक्य आत्ताच ऐकवावं की चार कुदळी मारुन ऐकवावं, या विचारात ते पडले.
‘‘गड्या, तुमच्या शिवारात श्टाबेऱ्या हैतं का?’’ नानाजींनी इच्यारलं.
‘‘मायंदाळ!’’ कर्मवीर म्हणाले. उत्साहानं त्यांनी आपल्या शिवारातल्या स्ट्राबेऱ्या, मालबेऱ्या, सफरचंदे, चिकू आदी रानमेवा भराभरा गोळा केला. टोपलंभर रानमेवा गोळा करुन येका आंब्याच्या झाडाखाली दोघं बसले.
‘‘त्ये तिडं बांधाकडं हिरवंगार दिसतंया, ऊस म्हनायचा का काय त्यो?’’ नानांनी इच्चारलं.
‘‘बांबू हाय…तीन वर्षात बघ किती वाडला!’’ कर्मवीरांनी उत्तर धिलं.
‘‘अगं बाबौ! येवढा बांबू? उगाच न्हाई तुमचा राजकारनात येवढा दबदबा!’’ टाळी देत नानांनी दाद धिली.
‘‘म्यां राजकारनातला नानाच हाय, असं लोक म्हनत्यात!’’ भाईसाहेबांनी लाजत सांगिटलं.
‘‘आन मला ॲक्टिंगचा कर्मवीर म्हनत्यात!’’ नाना हासून म्हनाले. बराच वेळ दोघंही न बोलता स्ट्राबेऱ्या खात बसले. अचानक आठवण येऊन कर्मवीर जागचं उठले, आनि त्यांनी भरारा जाऊन येक दांडगा फनस तोडून आनला.
‘‘ह्यो आमच्या दारचा फनस बरंका!’’ पुढ्यात फणस टाकत कर्मवीर म्हनाले.
‘‘बरका है की कापा?’’ नानांनी इच्यारलं. कर्मवीरांना काही सुचेना. दोघांनी बी फनस कापला आनि गरंच्या गरं फस्त क्येलं.
‘‘लई ग्वाड हाय की! कोकनातला फनस हितं कुटून आनला?’’ नानांनी इच्यारलं.
‘‘स्ट्राबेऱ्या आल्या थितनंच!’’ कर्मवीरांनी फणसाची बी थुंकत उत्तर धिलं.
‘‘काहीही म्हन गड्या, आपन दोघं बी फनसासारक़ंच! वरुन काटं आनि आतून मधावाणी ग्वाड…है का न्हाई?’’ नानांनी फणशीच्या बिया गोळा करत म्हटलं.
…सांजच्याला सूर्व्यादेव मावळतीला निंगाला तशी पाठीवर फनस घिऊनशान नाना शहरगावाकडं निंगाले. पांढरीची काठी खांद्यावं आडवी घिऊन त्यांच्या पाटमोऱ्या आकुर्तीकडं बघत कर्मवीर हुबंच ऱ्हायले.