नागपूर : महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आल्यानंतर शासनस्तरावर अशांची पडताळणी सुरू करण्यात आली.
त्यानुसार आता चारचाकी वाहने असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करीत त्यांचा योजनेअंतर्गतचा लाभही बंद करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींनाही दीड हजाराऐवजी पाचशे रुपयांचाच लाभ देण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात १० लाख ७३ हजार ६९३ लाडक्या बहिणी आहेत. यात लाभ घेणाऱ्यांमध्ये अनेक महिला नोकरदार आहेत. अनेकांकडे चारचाकी वाहने असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. अपात्र महिलांनी स्वतःच या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज आणि एक ऑनलाइन सुविधाही आहे.
शासनाने संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादीही गोळा केली आहे. आरटीओनेही शासनाकडे चारचाकी वाहने असलेल्या महिलांची यादी सादर केली आहे. अशांचा लाभ बंद करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनाने एक व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना आता महिन्याकाठी ५०० रुपये देण्याचे नियोजन आखले आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची आकडेवारी
शहरी भागातून अर्ज केलेल्या - ५,८०,३९९
ग्रामीणमधून अर्ज केलेल्या - ५,१९,३९९
शहरातील प्रत्यक्ष लाभार्थी - ५,६५,९६७
ग्रामीणच्या प्रत्यक्ष लाभार्थी - ५,०७,७२९
सुरुवातीलाच नाकारण्यात आलेले अर्ज - १९,४०४
५८ जणींनी लाभ घेणे केले बंद
जिल्ह्यात शासनाच्या आवाहनानुसार पुढे येत योजनेचा लाभ सोडण्यास तयार झाल्या आहेत. यामध्ये कुणी संजय गांधी निराधार, पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या तर कुणी आर्थिकरित्या सक्षम असलेल्या बहिणी असल्याचे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.